पुरोगामी कार्यकर्ते कॉ. प्रा. रणजित परदेशी काळाच्या पडद्याआड

रणजीत परदेशी www.pudhari.news

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्रातील जेष्ठ पुरोगामी कार्यकर्ते, प्रगत विचारवंत समाजशास्त्रज्ञ, मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादचे अभ्यासक व भाष्यकार प्रा. रणजित परदेशी यांचे रविवारी (दि.3) रात्री दहा वाजता दीर्घ आजाराने मालेगावी निधन झाले. प्रा. परदेशी हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते होते. येवला महाविद्यालयात अनेक वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. प्रसिद्ध विचारवंत कॉम्रेड शरद पाटील यांचे सहकारी, कॉग्रेड अशोक परदेशी, मालेगावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष परदेशी यांचे ते ज्येष्ठ बंधू होते.

महाराष्ट्रातील जातीव्यवस्था, चळवळ आणि प्रबोधनामध्ये प्रा. परदेशी यांचे मोठे योगदान राहिले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, एक गाव एक पाणवठा, महात्मा फुले बदनामीचा विरोध, मंडल आयोग समर्थन चळवळ, आणीबाणी विरोध, शिक्षण अधिकार आंदोलन, शेतमाल भाव आंदोलन या सारख्या असंख्य चळवळ आणि आंदोलनाला मार्गदर्शन करण्याचे त्यांनी गेली 40 वर्ष पेक्षा अधिक काळ काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले शेकडो कार्यकर्ते आज राष्ट्र सेवा दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, दलित-आदिवाशी- ग्रामिण संयुक्त महासभा, सत्यशोधक विद्यार्थी संघटना, सत्यशोधक जन आंदोलन, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा, सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक युवक आघाडी, सत्यशोधक ग्रामीण सभा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, शेतकरी संघटना, डेमोक्रॅटिक पक्ष आदी संघटना, पक्ष, आघाड्या मध्ये कार्यरत आहेत.

प्रा. परदेशी यांची मालेगाव कॅम्प येथील साने गुरुजी रुग्णालयापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर श्रीरामनगर स्मशानभुमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोकाटे, मामको बँकेचे जेष्ठ संचालक राजेंद्र भोसले, रमेश पवार, शिक्षक नेते अ. का. पाटील, भगवान चित्ते, किशोर डमाले यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कार्यालयाला उजाळा दिला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post पुरोगामी कार्यकर्ते कॉ. प्रा. रणजित परदेशी काळाच्या पडद्याआड appeared first on पुढारी.