पैठणी क्लस्टर योजनेंतर्गत महाराष्ट्र बँकेतर्फे कर्जवितरण

पैठणी pudhari.news

नाशिक (राजापूर) : पुढारी वृत्तसेवा
येवल्याच्या पैठणीची खरी ओळख ग्राहकांना होण्यासाठी पैठणीवर हॉलमार्किंग किंवा क्यू-आर कोड सिस्टीम अस्तित्वात आली. यामुळे ग्राहकांना खरी पैठणी मिळेल याचा उपयोग पैठणीच्या मार्केटिंगला बळकटीकरणासाठी निश्चित होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र बँकेचे सरव्यवस्थापक अरुण कबाडे यांनी केले.

महाराष्ट्र बँकेच्या वतीने पैठणी विणकर, उत्पादक, व्यापारी यांच्या हितासाठी पैठणी क्लस्टर योजनेसंदर्भात आयोजित टाउन हॉल मिटिंगमध्ये पैठणी व्यावसायिकांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बँकचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीराम भोर, पैठणी उद्योजक बाळासाहेब कापसे, श्रीनिवास सोनी, बाळासाहेब लोखंडे, उद्योगपती विनोद बनकर होते.

कबाडे यांनी खास केवळ येवलेकर पैठणी विणकारांसाठी लाभाची विशेष योजना काय आहे, हे स्पष्ट केले. बँकेचे कर्जविभागाचे मुख्य व्यवस्थापक युवराज पाटील यांनी क्लस्टर योजनेचा हेतू स्पष्ट केला. क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीराम भोर यांनी येवल्यात 50 विणकरांना हातमाग उपलब्ध करून दिले आहे. तसचे विणकारांना भविष्यात पैठणी क्लस्टरसह अनेक योजना राबविणारे असल्याचे सांगितले. पैठणी उद्योजक श्रीनिवास सोनी, पैठणी उद्योजक बाळासाहेब कापसे, बाळासाहेब लोखंडे, विनोद बनकर यांनी आपले अनुभव स्पष्ट केले. महाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक अरुण कबाडे यांच्या हस्ते कापसे पैठणी, संस्कृती पैठणी, मनमोहिनी पैठणी, नक्षत्र पैठणी यांना प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमंजुरी पत्राचे वितरण करण्यात आले.

विणकारांच्या चर्चासत्रात प्रवीण पहिलवान, अंकुश शिरसाठ, किरण भांडगे, दत्तात्रय मुंगीकर यांनी अनेक येणाऱ्या अडचणी मांडल्या. बँकेने येवल्याच्या पैठणीच्या आर्थिक स्थिरीकरणासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबविल्याने मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या पैठणी विणकर, व्यापारी विक्रेते, उत्पादक यांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा:

The post पैठणी क्लस्टर योजनेंतर्गत महाराष्ट्र बँकेतर्फे कर्जवितरण appeared first on पुढारी.