
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुन्हेगारी नियंत्रणासाठी शहर पोलिसांनी वेगवेगळ्या मोहिमा आखून गुन्हेगारांची धरपकड सुरू केली आहेत. तसेच अवैध धंद्यावरही कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वत: ‘एक्स’ या सोशल मीडिया माध्यमातून लाइव्ह येत नाशिककरांसोबत संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळातील शहरातील कायदा व सुव्यवस्थेकरिता नागरिकांचा अभिप्राय जाणून घेण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक लाइव्ह येणार आहेत.
नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेत किंवा सूचना, माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार कामकाजात बदल करीत शहर पोलिस कायदा व सुव्यवस्था राखत आहेत. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त तंत्रस्नेही पद्धतीने कामकाजावर भर दिला जात आहे. सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणांचा वापर वाढवण्यावर भर दिला असून, त्या माध्यमातून गुन्ह्यांची उकल, गस्त, पुरावे संकलन केले जात आहेत. पोलिसांच्या व्हॉटसॲप हेल्पलाइनमार्फत नागरिकांनी केलेल्या सूचना, तक्रारींनुसार पोलिसांनी कारवाई केल्या आहेत. शहरातील जॉगिंग ट्रॅकवर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी देत नागरिकांशी संवाद साधून मुद्दे जाणून घेण्यास सुरुवात केली आहे. ‘पोलिस ग्राउंड प्रेझेन्स’ ही तंत्रज्ञान आधारित पोलिस गस्त कार्यप्रणालीही आयुक्तालयाने सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून कर्णिक हे स्वत: येत्या काही दिवसांत एक्सवर लाइव्ह येणार आहेत. ‘एक्स लाइव्ह विथ सीपी’ याचे नियोजन सुरू असून, त्यासंदर्भातील वेळ व दिनांक नाशिक पोलिस ‘एक्स हॅन्डल’वर देण्यात येणार आहे. या संकल्पनेतून नागरिकांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्याचा प्रयत्न पोलिस आयुक्त करणार आहेत. त्यापुढील टप्प्यात आयुक्त व्यक्तिश: ‘एक्स’वरून नागरिकांशी मेसेज स्वरूपात संवाद साधतील.
‘एक्स’वर नागरिकांचे अभिप्राय, सूचना येत आहेत. त्याला ठरावीक वेळेत प्रतिसाद देत संवाद साधण्याचे नियोजन करीत आहोत. नागरिक त्यांची मते, समस्या नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या ‘एक्स हॅन्डल’वर कळवू शकतील. – संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त.
हेही वाचा:
- Pudhari Crime Diary : कुटुंब कलह : पहिला आघात महिलांवरच!
- जपानमध्ये पिकवला जातो जांभळा आंबा!
- RBI Monetary Policy Meeting | ब्रेकिंग! सातव्यांदा रेपो दरात कोणताही बदल नाही, RBI चा निर्णय
The post पोलिस आयुक्त 'एक्स' वरून साधणार लाइव्ह संवाद appeared first on पुढारी.