फोन उचला, कार्यकर्त्यांची कामे करा ; मुख्यमंत्र्यांकडून हेमंत गोडसेंना कानपिचक्या

एकनाथ शिंदे, हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून खा. हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास विरोध होता. परंतु शिवसैनिकांच्या आग्रहास्तव मी त्यांना दिलेला शब्द पूर्ण केला, असे सांगत कार्यकर्तेच खासदार, आमदार घडवत असतात. त्यामुळे त्याच्या अडीअडचणीला धावून जा, त्याला आवश्यक मदत करा. त्यांचे फोन उचला. पोलिस स्टेशन, हॉस्पिटलसारखी लहान-मोठी कामे करा. अन्यथा निवडणुका आल्या की मला विनंती करावी लागते. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार निवडून द्या, असे सांगावे लागते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाचे उमेदवार हेमंत गोडसे यांना भर सभेत कानपिचक्या दिल्या.

लोकसभा निवडणूक तसेच विजय करंजकर यांच्या समर्थकांच्या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोडसे विजयाची हॅट्ट्रिक साधतील, असा विश्वास व्यक्त करताना गोडसेंच्या उमेदवारीला झालेला विरोध आणि शब्दपूर्तीसाठी दिलेली उमेदवारी याबाबत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले की, कार्यकर्ता हाच खासदार, आमदार बनवत असतो. त्यामुळे त्याच्या अडीअडचणीला धावून जा, त्याला आवश्यक मदत करा. त्यांचे फोन उचला. पोलिस स्टेशन, हॉस्पिटलसारखी लहान-मोठी कामे करा. अन्यथा निवडणुका आल्या की, मला विनंती करावी लागते. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार निवडून द्या, असे सांगावे लागते. काही लोक फोन डायव्हर्ट करतात. परंतु गोडसे हे नंतर फोन करतात ही चांगली गोष्ट आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी गोडसे यांना सूचक इशारा दिला.

‘सलीम कुत्ता’वर मुख्यमंत्र्यांची नजर!

पालकमंत्री दादा भुसे यांनी आपल्या भाषणात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर टीका केली. यावेळी अचानक उपस्थित शिवसैनिकांनी सलीम कुत्ताच्या नावाचा गजर केला. यावेळी काळजी करू नका, कारवाई होणार, सलीम कुत्तावर मुख्यमंत्र्यांची नजर आहे, असा गर्भित इशारा भुसे यांनी दिला.

फलकावरून गोडसे, भुजबळांचे फोटो गायब

लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोलविण्यात आलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीत तसेच शिंदे गटाच्या मेळाव्यात व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर शिंदे गटाचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांचा फोटो नव्हता. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांचादेखील फलकावर फोटो नसल्याने चर्चा रंगली होती.

हेही वाचा –