बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, राज ठाकरेंनी सांगितली ‘तारीख’

MNS Social Media

पुढारी ऑनलाइन डेस्क; मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये पक्षाचा वर्धापन दिन पार पडतो आहे. त्यासाठी राज ठाकरे नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. आज (दि.9) वर्धापन दिन कार्यक्रमात राज यांनी मनसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना श्रद्धा व सबुरीचा सल्ला देत संयम ठेवायला सांगितला. दरम्यान आणखी बऱ्याच गोष्टी बोलायच्या असल्याचेही ते म्हणाले.

राज ठाकरे म्हणाले, मला आणखी बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. त्या गुढीपाडव्याला 9 एप्रिलला मी बोलणार आहे. महाराष्ट्र सैनिकांनी आजवर अनेक आंदोलने केली. महाराष्ट्रासाठी माझ्या मनसैनिकांनी तुरुंगवास भोगला, लाठ्याकाठ्या खाल्ल्या. मात्र आपले विरोधक आपल्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. मनसे आंदोलनांना सुरुवात तर करतात मात्र, ते अर्धवट सोडून देत असल्याचा आरोप काही जणांनी केला. अरे असे एक आंदोलन दाखवा ज्याचा आम्ही शेवट केला नाही असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमच्यावर आरोप करता मग अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक का नाही झाले? अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याचा शेवट झाला नाही. ते मी बोलणार असल्याचा इशाराच राज ठाकरे यांनी दिला. मुंबई, नाशिक सगळेकडे कुठेही जा रस्त्यांची दुर्दशा आहे. मग टोल कसले घेता? तुम्हाला मोबाईलवर मराठी ऐकायला आलं, टोल बंद झाले हे सगळं मनसेमुळेच हे लक्षात घ्या.

राज्य हातात द्या, सगळे भोंगे बंद करतो

प्रार्थना स्थळावरील भोंगे बंद झाले होते. मात्र सरकारने 17 हजार महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे नोंदवले. त्यांनी काय चुकीचे केले? या भोंग्यांचा मुस्लिमांनाही त्रास होतो, ते स्वत: तसे सांगतात. सरकारमुळे बंद झालेले भोंगे पुन्हा सुरु झाले. एकदा राज्य माझ्या हातात द्या सगळे भोंगे एक साथ बंद करतो, बघू कुणाची हिंमत असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

लोक म्हणतात विश्वास माझ्यावरच..

राजकारणात लोकांचा विश्वास टिकवणे महत्वाचे असते. बाकीच्यांनी जो विश्वास घालवला आहे तो आपल्याला कमवायचा आहे. सध्या ज्या प्रकारचे राजकारण सुरु आहे. माझं अजून ठाम मत आहे. सगळं आतून एकच आहे, फक्त जनतेला वेडे बनवताय, त्यांचे राजकारण सुरु आहे. महाराष्ट्राची मात्र माती करताय, महाराष्ट्र एकसंध राहु नये म्हणून जातीचे विष पसरवत आहे. जरांगे पाटील यांना भेटायला गलो तेव्हाच सांगितलं होतं हे होवू शकणार नाही. ज्या गोष्टी होऊ शकत नाही त्यावर आश्वासने दिली जातात. महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाला नोकरी, शिक्षण देणं सहज शक्य आहे. पण महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जाती-जातीत विष कालवण्याचे काम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

नाशिकमध्ये वर्धापन दिन, आधीच ठरवलं होतं…

मनसेला 18 वर्ष पूर्ण होत आहेत. नाशिकमध्ये यंदाचा वर्धापन दिन करायचा असल्याचे अाधीच ठरवलं होतं. यापुढे महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रमुख शहरात वर्धापन दिन साजरा करायचा असे ठरवलेले आहे, पुढचा कुठे करायचा ते बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पक्ष नव्हे, निवडून येणाऱ्या माणसांची मोळी

मला माझ्या कडेवर माझीच पोरं खेळवायची आहेत, सध्या महाराष्ट्रात दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन जो आनंद काहींना मिळतोय तो मला नको आहे. महाराष्ट्रात फक्त जनसंघ, शिवसेना व त्यानंतर मनसे अशी तीन पक्ष आहेत. राष्ट्रवादीला मी पक्ष मानत नाही. राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी, ते वेगळे झाले तरी निवडून येणार हे निश्चित. ते निवडून येतील त्यांनाच सोबत घेतात अशी टीका त्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली.

The post बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, राज ठाकरेंनी सांगितली 'तारीख' appeared first on पुढारी.