नाशिक : साड्या चोरुन पळणारी महिलांची टोळी जेरबंद

चोर महिलांना अटक,www.pudhari.news

नाशिक(सिन्नर) पुढारी वृत्तसेवा 

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील कापड दुकानातून सहा महिलांनी साड्यांची चोरी करुन पळ काढला. वावी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या काही तासांतच या महिलांना मुद्देमालासह अटक करण्यात यश मिळाले.

नांदूरशिंगोटे येथे आनंदा सांगळे यांच्या कापड दुकानात त्यांची पत्नी उषा, सून प्रियंका व कामाला असलेली मुलगी गायत्री होती. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुकानात सहा अनोळखी महिला व दोन पुरुष आले. उषा व गायत्री त्यांना साड्या दाखवू लागल्या. आणखी दोन तरुण दुकानात आले व त्यांनी अंतर्वस्त्रे खरेदी करायचे असल्याचे सांगितले. त्यामुळे उषा गायत्रीला साड्या दाखवायला सांगून खाली आल्या. ही संधी साधत महिलांनी गायत्रीला बोलण्यात गुंतवून साड्या चोरल्या. हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. साड्या आवडल्या नाही असे सांगत महिला खाली आल्या. त्यांच्यापाठोपाठ दुकानात आलेले दोघे तरुण बाहेर पडले. दुकानाबाहेर उभ्या असलेल्या दोन रिक्षांमधून मधून ते निघून गेले. महिलांच्या वर्तनाबाबत संशय वाटल्याने उषा यांनी पती व मुलाला सांगितले. मुलगा किरण याने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिलांनी साड्या चोरून नेल्याचे स्पष्ट झाले.

सुमारे साडेसहा हजार रुपयांच्या साड्या चोरीस गेल्याची माहिती किरण याने नांदूरशिंगोटे पोलिस चौकीत दिली. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सहायक पोलिस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्यासह वावी पोलिसांना पाठविले. रात्री दहाच्या सुमारास लोखंडे यांना पिंपरवाडी शिवारातील टोलनाक्यावरून जाणाऱ्या दोन रिक्षांबाबत संशय बळवला. लोखंडे यांनी वाहन आडवे लावून एक रिक्षा थांबवली. त्यातील तीन महिला व दोन पुरुषांना ताब्यात घेतले. रात्री साडेदहाच्या सुमारास दोन्ही रिक्षांमधील सहा महिला व दोन पुरुषांना पोलिस ठाण्यात आणले. नांदूर येथून सांगळे कुटुंबीयांसह पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांनी सर्वांना ओळखले. रिक्षाची झाडाझडती घेतल्यावर चोरीस गेलेल्या काही साड्या पोलिसांना मिळून आल्या. त्यानंतर सांगळे यांच्या फिर्यादीवरून वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा :

The post नाशिक : साड्या चोरुन पळणारी महिलांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.