Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट

विमानसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गेल्या १५ मार्चपासून नागपूर, गोवा, अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू करणाऱ्या इंडिगो कंपनीकडून आता १ जूनपासून इंदूर, हैदाराबाद विमानसेवा सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता अहमदाबादला दुसरी फ्लाइट सुरू केली जाणार आहे.

ओझर विमानतळ येथून ‘स्पाइसजेट’सह एकूण तीन कंपन्यांकडून विमानसेवा दिली जात होती. मात्र, नोव्हेंबरपासून दोन कंपन्यांनी सेवा अचानक बंद केली. त्यामुळे सध्या ‘स्पाइसजेट’कडून नवी दिल्ली व हैदराबाद या दोन शहरांसाठीच सेवा सुरू होती. नाशिकमध्ये आणखी कंपन्यांनी सेवा सुरू करावी, यासाठी उद्योग व पर्यटन क्षेत्राकडून पाठपुरावा सुरू होता. या पार्श्वभूमीवर हवाईसेवेतील नामवंत अशा ‘इंडिगो’ने नाशिकमध्ये १५ मार्चपासून आपल्या सेवांना प्रारंभ केला. नागपूर, गोवा व अहमदाबाद या तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू केली. मात्र, या तिन्ही शहरांना विशेषत: अहमदाबादसाठी प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता कंपनीने आणखी एक फ्लाइट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंदूर, हैदराबाद या सेवाही सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

सद्यस्थितीत अहमदाबादसाठी नाशिकहून सायंकाळच्या सत्रात फ्लाइट सुरू आहे. आता सकाळच्या सत्रातही फ्लाइट उपलब्ध करून दिली जाणार असल्याने व्यापार, उद्योजकांना याचा मोठा लाभ होणार आहे. इंडिगोव्यतिरिक्त सध्या स्पाइसजेट या कंपनीकडून दिल्ली सेवा सुरू आहे. आता इंडिगोने फ्लाइट वाढविल्याने नाशिकची हवाई कनेक्टिव्हिटी वाढली आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता इतरही शहरांना जोडणारी सेवा इंडिगोकडून सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

The post Nashik : इंडिगोची आता इंदूर, हैदराबाद विमानसेवा, वाढत्या प्रतिसादामुळे अहमदाबादला दुसरी फ्लाइट appeared first on पुढारी.