बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा

डॉ. हिना गावित,www.pudhari.news

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी केलेल्या नंदुरबार दौऱ्यादरम्यान येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. हीना गावित याच उमेदवार राहतील, असा स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात खासदार डॉ. हीना गावितांना पर्याय देण्याचा विचार होत असल्याच्या चर्चेला काही अंशी विराम मिळाला.

घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा विविध कार्यक्रमांसोबतच भाजपच्या कोअर कमिटीची बैठक बावनकुळे व आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत पार पडली. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत बावनकुळे यांनी एक किलोमीटर पायी चालून रहिवासी आणि व्यावसायिक यांना भेट घेतली.

सुपर वॉरियर संवाद कार्यक्रमात तसेच संपर्क से समर्थन यात्रेच्या समाप्तीनंतर झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना बावनकुळे यांनी मे 2024 च्या अखेरीस डॉ. हीना गावित यादेखील आपल्याला खासदार म्हणून निवडून आलेल्या दिसतील, असे वक्तव्य केले. त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात गावित परिवाराच्या विरोधात जनमत झाले असल्याचा अहवाल वरिष्ठांकडे गेला असून, खासदार डॉ. हीना गावित यांना पर्याय शोधला जात असल्याची चर्चा त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने पसरविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्येक बैठकीत आणि भाषणात दिलेले संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत. महामंत्री विजय चौधरी यांनीदेखील दोन दिवसांपूर्वीच खासदार डॉ. हीना गावित यांची उमेदवारी थोपविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा निरर्थक असल्याचा खुलासा केला होता.

हेही वाचा :

The post बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा appeared first on पुढारी.