त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद

त्र्यंबकेश्वर मंदिर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा-नाशिक येथे प्रसिद्ध कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रम होत असून, या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात मंगळवार (दि. 21) पासून पुढील सात दिवस व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. मात्र २०० रुपये देणगी दर्शन बारी सुरू राहणार आहे. (Trimbakeshwar Temple)

नाशिक येथे दि. २१ ते २५ नोव्हेंबर दरम्यान, पं. प्रदीप मिश्रा यांचा श्री शिवमहापुराण कथा कार्यक्रम होत आहे, तर दि. २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान शासकीय सुट्या आहेत. दि. २६ रोजी कार्तिक पौर्णिमा रथोत्सव आहे. या कालावधीत मंदिरात भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनावर निर्माण होणारा ताण व अडचणींचा विचार करता श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्र, राज्य अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज्यशिष्टाचारासंबंधी लेखी पत्रव्यवहारव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन दि. २१ ते २७ नोव्हेबर या काळात बंद ठेवण्यात आले आहे. या कालावधीत भाविकांना पूर्व दरवाजा दर्शनबारी तसेच उत्तर दरवाजा २०० रुपये देणगी दर्शन बारी सुरू राहणार आहे.

दर्शनबारीत भाविकांची गर्दी वाढल्यास दिवसभरातील काही कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात 200 रुपये देणगी दर्शन बंद ठेवण्यात येते. भाविकांच्या मागणीप्रमाणे 200 रुपये देणगी दर्शनाची सुविधा सुरू ठेवण्यात येते.

– कैलास घुले, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर, देवस्थान ट्रस्ट

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन बंद appeared first on पुढारी.