मोबाईल, गॅजेटस्च्या वाढत्या स्क्रनिंगचे दुष्परिणाम; समस्या बळावतेय

मायोपिया pudhari.com

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मानवी जीवनात बदलत्या लाईफस्टाईलसोबत मोबाईल व विविध इलेक्ट्रॉनिक गॅजेटस‌् ही दैनंदिन वापरातील गरज बनली आहेत. पण याच मोबाईल व गॅजेटस‌्च्या अतिवापरामुळे नागरिकांमध्ये मायोपियाच्या (दुरदृष्टी) समस्येत वाढ झाली आहे. विशेष करुन कोरोनानंतरच्या काळात लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक बळावल्याचे आढळून येत आहे.

चार वर्षापूर्वी कोरोनाच्या शिरकावाने अवघे जग वेठीस धरले. कोरोना लॉकडाऊनमुळे घरातूनच वर्क फ्राॅम होमची संकल्पना सर्वश्रुत झाली. नोकरदार वर्गाला घरातूनच लॅपटॉप, कॉम्प्युटरवर कार्यालयीन कामकाज करणे क्रमप्राप्त झाले. तर लहान बालके शाळांपासून दुरावली. त्यामुळे ऑनलाईन अध्यापनाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोबाईलच्या वाढत्या वापराची क्रेझ निर्माण झाली. मात्र दैनंदिन जीवनाचा भाग बनलेले माेबाईल व इलेक्ट्रॉनिक गॅजेस्टचे दुष्परिणाम आता कुठे पुढे यायला सुरवात झाली आहे.

वाढत्या स्क्रनिंगमुळे नागरिकांमध्ये मायोपियाची समस्या बळावली आहे. विशेषत: मोबाईलचा अति वापर करणाऱ्या ६ ते १६ वयोगटातील मुलांमध्ये ही समस्या अधिक जाणवते आहे. कमी वयातच दुर दृष्टीचा त्रास जाणवू लागल्याने मुलांमध्ये चष्मा वापरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. त्यामुळेच पालकांनी वेळीच सावध होत मुलांना मोबाईल तसेच इलेक्ट्राॅनिक गॅजेटस‌्च्या वापरापासून परावृत्त करताना त्यांना सकस व संतुलित आहारासह नियमित डोळे तपासणी करण्याचा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

मायोपिया कधी सुरू होतो?
मायोपिया, किंवा दूरदृष्टी ही एक सामान्य दृष्टी समस्या आहे. त्यामध्ये जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. पण दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसायला लागतात. साधारणत: 6 ते 14 वयोगटात सुरू होते. हे अंदाजे ५ टक्के प्रीस्कूलर, साधारणत: 9 टक्के शालेय वयोगटातील मुले आणि 30 टक्के किशोरवयीयांना प्रभावित करते. एका अभ्यासानूसार मायोपिया अमेरिकेच्या जवळपास 30 टक्के लोकसंख्येला प्रभावित करते.

मायोपियाची लक्षणे
-डोकेदुखी
-दूरच्या वस्तू दृष्टीस अंधुक दिसणे
-डोळ्यांचा ताण अथवार डोळ्यांचा थकवा
-स्क्विंटिंग

मायोपिया काय आहे?
मायोपिया ही डोळ्यांची समस्या आहे. ज्याला सामान्यत: नजरदृष्टी किंवा ऱ्हस्व दृष्टीदोष म्हणूनही ओळखले जाते. या स्थितीत व्यक्तीला जवळची वस्तू स्पष्ट दिसते. मात्र, दुरची वस्तू या अस्पष्ट दिसतात. जेव्हा आपल्या डोळ्यांचा आकार थोडासा बदलतो व प्रकाशाची किरणे थेट रेटिनावर पडत नाहीत तेव्हा असे घडते. अनेकांमध्ये मायोपिया किंवा कमीतकमी मायोपिया विकसित करण्याची प्रवृत्ती वारशाने मिळते. त्याचे महत्त्वपूर्ण पुरावे उपलब्ध आहेत. जर १ किंवा दोन्ही पालक मायपोयी समस्येनेग्रस्त असल्यासे त्यांच्या मुलांमध्येदेखील दूरदृष्टीची अभाव असल्याची असण्याची शक्यता वाढते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

मायोपिया खराब होण्याची कारणे
काही अभ्यासानुसार, संगणक, टॅब्लेट आणि स्मार्टफोनसारख्या डिजिटल उपकरणांचा अतिवापर केल्याने मायोपिया वाढण्यास हातभार लागतो. तसेच घराबाहेर वेळेच्या अभावामुळेदेखील मायोपिया वाढू शकतो. बाह्य क्रियाकलापांमध्ये आपल्या अंतरदृष्टीचा उपयोग न केल्याने मायोपिया होऊ शकते.

आजार टाळण्यासाठी काय कराल?
-मुलांनी डिजीटल साधनांचा अतिवापर टाळावा.
-नियमित व्यायाम करावा
-संतुलित आहार घ्यावा
-मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे
-मुलांचे डाेळे नियमित तपासावे

मायोपिया ही डोळ्यांची एक समस्या आहे. या समस्येत व्यक्तीला मायनस नंबरचा चष्मा लागतो. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत चष्म्याच्या नंबरमध्ये वाढ होते. मायोपीया वाढीचे नेमके कारण म्हणजे अति माेबाईल व इलेक्ट्राॅनिक वस्तूंच्या वापर हे आहे. लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येत आहे. पालकांनी व मुलांनी वेळीच ही समस्या ओळखून संतुलीत आहार घेण्यासह मोबाईल व गॅजेटस‌्चा वापर कमी केला पाहिजे. – सुजय खरे, नेत्ररोग्यतज्ज्ञ.

कोरोनानंतर जनतेमध्ये मोबाईच्या वापराचे प्रमाण अधिक वाढल्याचे चित्र असून रुग्णसंख्येत पाच पटीने वाढ झाली आहे. सामान्यत: लहान मुलांसाठी मोबाईल हे एक व्यसन झाले आहे. मोबाईलच्या अती वापरामुळे डोळ्यांच्या समस्या व अन्य आजार बळावत आहे. त्यामुळे मोबाईलच्या वापराबद्दल पालकांनी व मुलांनी स्वयं आचारसंहिता अंगीकारणे गरजेचे आहे. – डॉ. हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ.

The post मोबाईल, गॅजेटस्च्या वाढत्या स्क्रनिंगचे दुष्परिणाम; समस्या बळावतेय appeared first on पुढारी.