आमदार सत्यजित तांबेंचे सर्वपक्षीय आमदार-खासदारांना रेल्वेमार्गाबाबत साकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक, पुणे आणि नगर जिल्ह्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाचा मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी उचलला असून, हा मार्ग पूर्वनियोजित आराखड्याप्रमाणेच व्हावा, यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. या रेल्वेमार्गावर येणाऱ्या सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमधील लोकप्रतिनिधींना पत्र लिहीत आ. तांबे यांनी या प्रकल्पासाठी एकत्रित संघर्ष करण्याचे आवाहन केले.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे शिर्डीमार्गे गेल्यास सिन्नर, संगमनेर, जुन्नर, नारायणराव, मंचर, चाकण या भागांचे मोठे नुकसान होणार आहे. या भागांतून पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षण, नोकरी किंवा उद्योगधंदे यासाठी लोक जातात. पुणे व नाशिक या जिल्ह्यांमधील चाकण, भोसरी, मुसळगाव आणि सिन्नर या चार औद्योगिक वसाहतीदेखील याच मार्गावर आहेत. असे मोठे प्रकल्प एकदाच होतात. त्यामुळे हा प्रकल्प शिर्डीऐवजी पूर्वनियोजनाप्रमाणे व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन आमदार तांबे यांनी पत्राद्वारे केले.

अहमदनगर-पुणे हा रेल्वेमार्ग दौंडमार्गे असल्याने रस्ते मार्गाने नगर-पुणे हे अंतर गाठायला जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा दुप्पट वेळ रेल्वेमार्गाने लागतो. परिणामी, अहमदनगर-पुणे रेल्वेचा कोणताही फायदा अहमदनगर किंवा पुणे जिल्ह्यांतील नागरिकांना झालेला नाही. त्यामुळे अहमदनगर ते पुणे रेल्वेमार्ग हा सरळमार्गाने असावा, ही नगरकरांची जुनी मागणी होती. हीच चूक नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत होण्याची शक्यता आहे. नाशिक-पुणे रेल्वेमार्ग फक्त नावापुरता नाशिक-पुणे राहील, पण या रेल्वेचा कोणताही फायदा सिन्नर, संगमनेर, जुन्नर, आंबेगाव, चाकण, मंचर या भागांतील लोकांना होणार नाही, याकडे आ. सत्यजित तांबे यांनी लक्ष वेधले.
चौकट

कोणाकोणाला लिहिले पत्र?
सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार हेमंत गोडसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार अमोल कोल्हे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते-पाटील, आमदार माणिकराव कोकाटे आदी लोकप्रतिनिधींशी आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रव्यवहार केला आहे.

‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सगळ्यांनी संघर्ष करावा!
सर्वांनी जागे होऊन एकत्र येत या विरोधात लढा दिला, तरच नाशिक, सिन्नर, संगमनेर, चाकण पट्ट्यातील लाखो लोकांना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकेल. – सत्यजित तांबे, आमदार.

The post आमदार सत्यजित तांबेंचे सर्वपक्षीय आमदार-खासदारांना रेल्वेमार्गाबाबत साकडे appeared first on पुढारी.