नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

crime

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर गावातील विधाते गल्लीत सोमवारी (दि. २६) झालेल्या परप्रांतीय विवाहितेच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या नातेवाइकास अवघ्या काही तासांत गजाआड केले. गावाकडील जमिनीच्या वादातून त्याने खून केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने खुनाची उकल केली.

अशोक्तीबाई शनिदयाल बैगा (२९, रा. विधाते गल्ली, सातपूर गाव, मूळ रा. मध्य प्रदेश) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. सातपूर पोलिस ठाण्यात पती शनिदयाल बैगा यांनी खुनाची फिर्याद दिली होती. जयकुमार परसराम बैगा (२६, रा. विधाते गल्ली, सातपूर गाव, मूळ रा. मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. बैगा कुटुंबीय हे रोजगारानिमित्त तीन दिवसांपूर्वीच नाशिकला आले होते. सोमवारी (दि. 26) पहाटे शनिदयाल बैगा हे कंपनीत कामावर गेले, तर त्यांची दोन मुले हे घरातीलच वरच्या खोलीत मोबाइलवर सिनेमा पाहात होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित जयकुमारने घरात येऊन अशोक्तीबाई यांच्याकडे गावाकडील जमिनीबाबतचा विषय काढला. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर जयकुमारने घरातील चाकूने अशोक्तीबाई यांचा गळा चिरून त्याच्या घरी गेला. मुले खाली आल्यानंतर खुनाचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी घरातील संशयितांकडे चौकशी केली असता, जयकुमार आल्याचे उघड झाले. त्याचा जबाब व सीसीटीव्हीतील संशयास्पद हालचालींमुळे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर त्यानेच खून केल्याचे उघड केले.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ दोनचे उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सातपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंकज भालेराव, सहायक निरीक्षक धीरज गवारे, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक श्रीवंत, बाळू वाघ यांच्या पथकाने गुन्हा उघडकीस आणला.

तांत्रिक माहितीवरून उकल

गुन्ह्याची उकल करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली असता, त्यामध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती बैगा यांच्या घराजवळ आढळून आली नाही. त्यामुळे घरातच वरच्या माळ्यावर राहणाऱ्या ११ जणांकडे पोलिसांनी चौकशी केली. संशयित जयकुमार यांच्या जबाबात तफावत व सीसीटीव्हीतील त्याच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने पोलिसांनी त्याला पकडले.

हेही वाचा :

The post नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड appeared first on पुढारी.