बिअरच्या बाटल्या फोडत महिलेच्या दिशेने गोळीबार

गोळीबार

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथे मित्राशी झालेल्या भांडणाच्या कारणावरून बिअरच्या बाटल्या फोडून महिलेच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

जय भवानी रोड, फर्नांडिसवाडी येथील साई श्रद्धा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या बर्खा अजय उज्जैनवाल यांचे पती अजय उज्जैनवाल हे शुक्रवारी (दि. २) मध्यरात्री घरी झोपलेले असताना, अचानक त्यांच्या इमारतीच्या खाली काचेच्या बाटल्या फोडण्याचा आवाज व शिवीगाळ ऐकू आली. यावेळी बर्खा व अजय उज्जैनवाल हे काय झाले, हे बघण्यासाठी इमारतीखाली आले असता, टक्कू उर्फ सनी पगारे, बारक्या उर्फ श्रीकांत वाकुडे, इर्शाद चौधरी, दीपक चाट्या, गौरव गांडले हे इमारतीवर बिअरच्या रिकाम्या बाटल्या फोडून अजय यांचा मुलगा राहुल उज्जैनवाल याच्या नावाने शिवीगाळ करत होते. बर्खा उज्जैनवाल यांनी राहुल घरी नसल्याचे सांगितले. मयूर व संजय बेद यांच्याशी झालेल्या जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुलला मारण्याच्या उद्देशाने हे टोळके आले होते. यावेळी संशयितांनी राहुलला समोर आणा, त्याचा मुडदा पाडतो, अशी धमकी देत इर्शाद चौधरीने बर्खा यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र सुदैवाने त्या गोळ्या बाजूने गेल्या.

इतर संशयितांच्या हातात कोयते होते. आरडाओरड व गोळीबाराच्या आवाजाने रहिवासी जागे होताच संशयित दोन दुचाकींवर पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post बिअरच्या बाटल्या फोडत महिलेच्या दिशेने गोळीबार appeared first on पुढारी.