बुडालेले दोन्ही पर्यटक मुंबईचे : 48 तासांनंतर पर्यटकांचा शोध

इगतपुरी (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा – इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन दिवसांपूर्वी बुडालेल्या मुफदल सैईफउद्दिन हरहरवाला (५२, रा. सैफिक पार्क, चर्च रोड, मरळ, अंधेरी) यांचा मृतदेह मंगळवारी (दि. २८) बचाव पथकाला ४८ तासांच्या प्रयत्नानंतर आढळून आला. तर सोमवारी संध्याकाळी सिद्धेश दिलीप गुरव (२३, रा. लालबाग, मुंबई) याचा मृतदेहदेखील हाती लागला आहे.

वैतरणा धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटक बुडाल्याची घटना घडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार श्वेता संचेती, स्थानिक मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह घोटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील, उपनिरीक्षक आशिष रोही, पोलिस हवालदार रामकृष्ण लहामटे, पराग गोतरणे, शिवाजी शिंदे, गौरव सोनवणे, तसेच महिंद्रा कंपनीतील फायरमन हरीश चौबे यांच्यासह बचाव पथकाचे आकाश देशमुख, विजय घारे, अविनाश म्हसणे, आकाश भागडे आदींनी तळ ठोकून बुडालेल्यांचा शोध घेत होते. पाण्याचा वेग अधिक असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले. दरम्यान, या आठवड्यात एकूण नऊ जणांचा पाण्यात बुडून अंत झाला आहे. मुंबईतील पर्यटकांचा व नाशिक रोड येथील तीन मुली व दोन मुलांचा मृत्यू तसेच शेणवड येथील मायलेकींचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनाकडूनदेखील नागरिकांना पाण्यापासून दूर राहण्याचा आवाहन करण्यात येत आहे.

धरणावर सुरक्षारक्षकांची गरज

इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धरणे आहेत. त्यामुळे येथे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी ठिकाणांहून मोठ्या प्रमाणावर पर्यटक फिरण्यासाठी येतात. मात्र, धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी कोणत्याही प्रकारची धोक्याची दिशादर्शक फलके लावलेली दिसून येत नाहीत. तसेच धरणावर सुरक्षारक्षक नाहीत. पावसाळ्यातदेखील धरण परिसरात मोठी गर्दी होत असते. त्यामुळे वैतरणासह दारणा, भावली, भाम, त्रिंगलवाडी धरणावर सुरक्षेच्या उपाययोजना होणे आवश्यक आहे.

हेही वाचा: