करण गायकर यांनी घेतली वंचितचे अध्यक्षांची भेट, आज उमेदवारीची घोषणा

वंचित pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीसोबत अखेरपर्यंत घरोबा होऊ न शकल्यामुळे वंचितने ‘एकला चलो’ची भूमिका घेत आतापर्यंत चार याद्यांमधून ४२ उमेदवारांची घोषणा केली आहे. नाशिकच्या आखाड्यात देखील वंचित उमेदवार उतरविणार असून, त्याबाबतची अधिकृत घोषणा रविवारी (दि.२१) पक्षाचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केली जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, शनिवारी (दि.२०) छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेत उमेदवारीची मागणी केल्याने, त्यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ पडणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

नाशिकमधून महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना रिंगणात उतरविले जाणार असल्याची चर्चा रंगल्याने, वंचित वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत होते. मात्र, भुजबळ यांनी उमेदवारीच्या रेसमधून माघार घेतल्याने, नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलली असून, वंचित विनाविलंब उमेदवार घोषित करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, गायकर यांनी प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथे भेट घेत निवडणूकीबाबत तब्बल दोन तास चर्चा केली. चर्चेत नाशिक लोकसभा मतदारसंघातील राजकीय, जातीय, विजयाची समीकरणे, नातेगोते याविषयीची माहिती गायकर यांच्याकडून जाणून घेतली. मराठा, दलित, मुस्लिम मतांची जुळवाजुळव कशी करता येईल, महाविकास आघाडी, महायुतीच्या उमेदवाराचा पराभव कसा करता येईल, याबाबत देखील सखोल चर्चा झाली. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, जिल्हाप्रमुख पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे, तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या १५ वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, तसेच शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. अनेक गुन्हे अंगावर घेऊन या समाजकार्यात उडी घेतली आहे. त्यास वंचितची भक्कम साथ मिळणार आहे. मराठा, ओबीसीसह सर्वच १८ पगड जातींना बरोबर घेऊन निवडणूक लढणार आहे. यात दलित, मराठा, मुस्लिम, आदिवासी यांच्यासह इतरही समाजाचे बळ मिळेल, याची खात्री आहे. – करण गायकर, संभाव्य उमेदवार, वंचित.

मराठा मतांचे विभाजन
पुणे आणि बीडसह इतर मतदारसंघांमध्ये वंचितने मराठा उमेदवार मैदानात उतरविले आहेत. नाशिकमध्ये करण गायकरच्या रुपाने वंचित हा प्रयोग करण्याची शक्यता आहे. मराठा समाजाच्या मतांवर डोळा ठेवून वंचित हा प्रयोग करू इच्छित असला तरी, मराठा समाज प्रत्यक्षात वंचितच्या उमेदवाराच्या पाठीशी कितपत उभा राहणार, हे सांगणे अवघड आहे. याशिवाय महाविकास आघाडीने मराठा उमेदवार मैदानात उतरविला असून, महायुतीकडून देखील मराठा चेहराच दिला जाणार आहे. अशात मराठा समाजाच्या मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: