नाशिक विभागात भूजल पातळी घटली, ४४ तालुक्यांत पाणी पाच मीटरहून अधिक खोल

दुष्काळाच्या झळा, Nashik Drought News www.pudhari.news

[author title=”नाशिक : गौरव जोशी” image=”http://”][/author]
मान्सूनने फिरवलेली पाठ आणि धरणीच्या पोटातून पाण्याचा वारेमाप होणारा उपसा यामुळे नाशिक विभागातील भूजल पातळीत घट झाली आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सरासरी १.५१ मीटरने भूजल पातळी घसरली आहे. विभागातील तब्बल ४४ तालुक्यांत ५ ते १० मीटरपर्यंत पाणी खोल गेले असून, त्यात नाशिक जिल्ह्यातील १२ तालुक्यांचा समावेश आहे. भूजलचा घटता आलेख ही भविष्याच्या दृष्टीने अधिक चिंताजनक बाब आहे.

तळपत्या उन्हाबरोबर नाशिक विभागात पाण्याच्या दुर्भिक्षात वाढ झाली आहे. पाचही जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ जनतेवर ओढवली आहे. विभागातील भूजल पातळीत झपाट्याने घसरण झाल्यामुळे दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) मार्चमधील अहवालानुसार विभागात ४४ तालुक्यांमध्ये भूजल पातळीत ५ ते १० मीटरपर्यंत पोहोचली आहे. विशेषत: २०१९ ते २०२३ या पाच वर्षांतील मार्च महिन्याशी तुलना केल्यास यंदाच्या वर्षी साधारणत: ३.२४ मीटरपर्यंत भूगर्भातील पाणी खाेल गेले आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती विचारात घेता, बागलाण, देवळा व कळवण हे तीन तालुके वगळता उर्वरित तालुक्यांतील भूजल पातळी ही १० मीटरच्या आत आहे. त्याच वेळी बागलाणला ११.५२ मीटर, देवळ्यात १०.७, तर कळवणला सर्वाधिक १२.२५ मीटरपर्यंत भूगर्भातील पाणीपातळी खालावली आहे. विभागातील भूजल पातळीचा आलेख लक्षात घेता, यावल (जि. जळगाव) येथे मार्च महिन्यात भूजल पातळी २५.९५ मीटरपर्यंत खालावली आहे. ही यावलवासीयांसाठी चिंतेत टाकणारी बाब आहे, तर १६ ते २० मीटरपर्यंत भूजल पातळी खालावलेले दोन तालुके असून, त्यात जळगाव व रावेरचा समावेश आहे. विभागात २०२३ मध्ये अपुऱ्या पावसामुळे भूजल पुनर्भरणात अनेक अडचणी आल्या. नदी, बंधारे, कालवे किंवा अन्य कोणत्याही स्रोतातून पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे जनतेची भिस्त सारी भूगर्भातील उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. मात्र, हे सत्य असले, तरी वारेमाप पाणी उपशामुळे भूगर्भातील पाणीपातळी सातत्याने खालावत आहे. भविष्यातील मानवी जीवनाच्या दृष्टिकोनातून हे संकट अधिक भयानक असणार आहे. त्यामुळे भूजल पातळीच्या पुनर्भरणासाठी आतापासूनच कठोर पावले उचलणे क्रमप्राप्त आहे.

भूजल पातळीची स्थिती (तालुक्यांची संख्या)
मीटर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नगर एकूण
५ ते १० 12 03 06 09 १४ 44
११ ते १५ 03 0१ 00 03 00 07
१६ ते २० 00 00 00 02 00 02
२१ ते २६ 00 00 00 01 00 01

भूजल पातळीत वाढ गरजेची
भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी निव्वळ जमिनीवर दिसणाऱ्या पाण्याचा विचार करून चालणार नाही, तर भूजल पातळीचे पुनर्भरण करणे गरजेचे आहे. त्याकरिता विविध उपाययोजना राबविल्या पाहिजे. सर्वप्रथम पडणाऱ्या पावसाच्या थेंबाथेंबाचे नियोजन आवश्यक आहे. प्रत्येक इमारतीला रेनवाॅटर हार्वेस्टिंग बंधनकारक करतानाच भूगर्भातून उपसा हाेणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

भूजल पातळी घसरण्याची कारणे
-भूगर्भामध्ये पाण्याचे पुनर्भरण न होणे
-शहरी-ग्रामीण भागांत वारेमाप वाढणारे बाेरिंग
-पावसाच्या पाणी जमिनीत न मुरणे
-दिवसेंदिवस पाण्याचा होणारा अपव्यय