नाशिकमध्ये ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ

नाशिक उकाड्यात वाढ

नाशिक : शहरात गुरुवारी (दि.२७) पहाटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. नाशिकरोडला काही ठिकाणी गाराही बरसल्या. त्यानंतर दिवसभर ऊन आणि ढगाळ हवामान यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. त्यामुळे वातावरणातील उकाड्यात वाढ झाल्याने शहरवासीयांना घरात बसणे मुश्कील झाले. शहरात ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.

राज्याच्या विविध भागांमध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट घोषित केला आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.२७) पहाटे नाशिकरोडच्या काही भागात गारांसह अवकाळीच्या हलक्या सरी बरसल्या. अवघ्या पाच ते दहा मिनिटे झालेल्या पावसाने नाशिकरोडवासीयांची झोपमोड केली. तर सिडको, इंदिरानगर, सातपूर व पंचवटी परिसरातही काही ठिकाणी हलका पाऊस झाला. त्यानंतर दिवसभर उकाड्याने नाशिककर त्रस्त झाले. ग्रामीण भागातही उष्मा जाणवत असून, ग्रामीण जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ appeared first on पुढारी.