ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत वृद्धेस साडेदहा लाखांना गंडा

Nashik Fraud News www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-एका भामट्याने वृद्धेस मदतीच्या बहाण्याने ‘एनी डेस्क’ नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून त्या ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत परस्पर १० लाख ५० हजार रुपये काढून गंडा घातला. ४ ते ५ जानेवारी दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी आदिती चटर्जी (६०, रा. दसकगाव) यांनी सायबर पोलिसांकडे फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.

आदिती यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने त्यांना ४ ते ५ जानेवारी दरम्यान ऑनलाइन गंडा घातला. आदिती या डिस्ने हॉटस्टार या ॲपची सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. त्यासाठी त्यांनी गुगलवर कंपनीचा संपर्क क्रमांक शोधून त्यावर संपर्क साधला. मात्र तो क्रमांक कंपनीऐवजी भामट्याचा होता. भामट्याने आदिती यांना मदत करण्याच्या बहाण्याने एनी डेस्क हे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर या ॲपच्या माध्यमातून भामट्याने आदिती यांच्या मोबाईलचा ताबा घेतला. तसेच पेमेंट करण्याच्या बहाण्याने आदिती यांच्याकडून नेट बँकींगची सर्व माहिती संकलित करून भामट्याने नेट बँकींग करून १० लाख ५० हजार रुपये परस्पर काढून आदिती यांना आर्थिक गंडा घातला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा :

The post ॲपमार्फत मोबाइलचा ताबा घेत वृद्धेस साडेदहा लाखांना गंडा appeared first on पुढारी.