नाशिक : नमामि गोदासाठी सुधारीत आराखडा सादर करणार

गोदावरी नाशिक,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा- गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी महापालिकेने सादर केलेल्या २७८० कोटींच्या ‘नमामि गोदा’ आणि मलनिस्सारण केंद्रांच्या क्षमतावाढ व नुतनीकरणाच्या ५३० कोटींच्या आराखड्यातील कामांमध्ये साम्य असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश केंद्रीय जलशक्ती मंत्रालयातील बैठकीत महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. येत्या महिनाअखेर संयुक्त प्रस्ताव केंद्राला सादर केला जाणार असल्याचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी सांगितले.

२०२७-२८मध्ये नाशकात सिंहस्थ कंभुमेळा होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशातील ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशकात ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याची योजना आहे. तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची संकल्पना तत्कालिन सत्तारूढ भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे मांडल्यानंतर या प्रकल्पाला तत्वत: मान्यता देत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या प्रकल्पासाठी १८०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते. सल्लागार संस्थेच्या माध्यमातून महापालिकेने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करत केंद्राला सादर केला होता. या योजनेत नवीन मलनिस्सारण केंद्रांच्या उभारणीबरोबरच अस्तित्वातील जुन्या मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण प्रस्तावित आहे. दरम्यान, जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत नाशिक शहरातील मलनिस्सारण केंद्रांची क्षमतावाढ व आधुनिकीकरण तसेच मलजलवाहिन्यांचे जाळे विकसित करण्यासाठी ५३० कोटी रुपये खर्चाचा स्वतंत्र प्रस्ताव देखील महापालिकेने शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावांबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेचे संचालक अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांना पाचारण करण्यात आले होते. नमामि गोदा व मलनिस्सारण केंद्रांच्या आधुनिकीकरणाच्या दोन्ही प्रस्तावांतील कामांमध्ये साम्य असल्यामुळे दोन्ही योजनांचा एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे अस्तित्वातील मलनिस्सारण केंद्रांतील यंत्रणा कालबाह्य ठरल्यामुळे या केंद्रांची क्षमतावाढ न करता नव्या तंत्रज्ञानावर आधारीत मलनिस्सारण केंद्र उभारण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.

असा आहे नमामि गोदा प्रकल्प…

महापालिका क्षेत्रातील मुख्य मलवाहिकांची दुरुस्ती क्षमता वाढ व सुधारणा, आडविणे व वळविणे, मखमलाबाद व कामटवाडा येथे मलनिसारण केंद्र बांधणे, नव्याने विकसित झालेल्या व होणाऱ्या रहिवासी भागांमधील मलजल व सांडपाणी मलिनिससारण केंद्राकडे वळविण्यासाठी सिवर लाईनचे जाळे टाकण्याची कामे करणे, नद्यांचा किनारा अत्याधुनिक करणे व गोदावरी नदीवर विविध घाटांचे नूतनीकरण करून नवीन घाट बांधणे, महापालिका क्षेत्रातील औद्योगिक प्रदूषित पाणी एसटीपीच्या माध्यमातून पुनर्वापर करण्यासाठी यंत्रणा उभारणे आदी कामांचा नमामि गोदा प्रकल्पात समावेश आहे.

असा होणार खर्च…

* केंद्र व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार विद्यमान मलनिस्सारण केंद्रांचे अद्यावतीकरण आणि सक्षमीकरण, सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापरण करणे- ३९८.१८ कोटी.

* जुन्या मलवाहिका बदलून नवीन अधिक क्षमतेच्या मलवाहिका टाकणे व नव्याने विकसित झालेल्या भागात मलवाहिकांचे जाळे तयार करणे- ९२७.३४ कोटी.

* नवीन मलनिस्सारण केंद्रांची उभारणी- ६२२.०९ कोटी.

* नदीघाट विकास व सौंदर्यीकरण- ८३२.६३ कोटी.

हेही वाचा :

The post नाशिक : नमामि गोदासाठी सुधारीत आराखडा सादर करणार appeared first on पुढारी.