अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका

ekanath khadse

जळगाव : पुढारी वृत्तसेवा; राज्यात मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री असले तरीदेखील एकनाथ शिंदे हे एकाकी पडले असून, अजित पवार व्याधीग्रस्त, तर देवेंद्र फडणवीस प्रचारात व्यस्त असून, दोघांनाही आरक्षणाबाबत चिंता नसल्याची टीका आमदार एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर केली आहे. यासोबतच शिंदे यांची आरक्षणाबाबत प्रामाणिक तळमळ दिसत आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्यांना साथ नसल्याचे आ. खडसे म्हणाले.

मराठा आरक्षणासंदर्भात एकदिवसीय अधिवेशन घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली. अधिवेशनाचा फायदा होईल की नाही, हे जरी स्पष्ट नसले तरी विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे शिफारस करता येईल. सोबतच अधिवेशनातील चर्चेदरम्यान कोण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने आहे व कोणाचा विरोध आहे ही भूमिकादेखील अधिवेशनातून स्पष्ट होईल, असे मत आ. खडसे यांनी व्यक्त केले.

राज्य जळत असून, कायदा व सुव्यवस्था राज्यात शिल्लक राहिली नाही, मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची हानी होत असून, यावर नियंत्रण मिळवण्यास गृहमंत्री अपयशी ठरले आहेत. त्यामुळे अधिवेशनात याबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी मराठा समाजात मोठा रोष असून, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना मुख्यमंत्र्यांना आरक्षण देण्याची इच्छा नाही. मुख्यमंत्र्यांची इच्छा असल्यास ते आरक्षण देऊ शकतात व राज्य सरकारला तसे अधिकार असल्याचे भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. आम्ही सत्तेत आल्यास आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही अन्यथा राजकीय संन्यास घेईल, असे विधानदेखील फडणवीस यांनी केल्याची आठवण त्यांनी करून दिली. .

आरक्षणासाठी वेळ वाढवून देण्याची गरज नाही

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे-पाटील यांनी 40 दिवसांचा कालावधी राज्य सरकारला दिला होता. मात्र, अजूनदेखील सरकारकडून वेळ मागितला जात आहे. जी वेळ सरकारकडून मागितली जाते त्यावेळेस सरकार काहीच करत नाही, त्यामुळे पुढे अधिक वेळ दिल्यानंतरसुद्धा सरकार काही करेल याची शक्यता नाही. त्यामुळे सरकारची विश्वासार्हता कमी होत असून, सरकारला अजून वेळ वाढवून देण्याची गरज नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांकडून साधी नोंदही नाही

मराठा आरक्षणासाठी राज्यात एवढी मोठी आंदोलने सुरू असताना शिर्डीमध्ये येऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधी देखल देखील घेतली नाही. दुसरीकडे राज्य जळत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी बाहेर फिरत आहेत. त्यामुळे त्यांना झोप तरी कशी लागत आहे, असा प्रश्नही आ. खडसे यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

The post अजित पवार व्याधीग्रस्त, फडणवीस प्रचारात व्यस्त : एकनाथ खडसे यांची टीका appeared first on पुढारी.