नाशिकमधील शीतगृहावर धाड; लाखोंची मिरची, धने पावडर जप्त

मिरची पावडर जप्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त पदार्थ विकणारे सरसावल्याने, त्यांच्यावर जरब बसविण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाकडून मोहीम हाती घेण्यात आली आहे. सातपूर भागातील नारंग कोल्ड स्टोअरेज येथे धाड टाकून प्रशासनाने कुठलेही लेबल नसलेल्या लाखो रुपयांच्या मिरची आणि धने पावडरचा साठा जप्त केला आहे.

अन्न, औषध प्रशासनाने नारंग कोल्ड स्टोअरेज येथे धाड टाकून तेथील पदार्थांची तपासणी केली. त्यात मार्च २०२३ पासून साठविलेला आणि कुठलेही लेबल नसलेला तब्बल १० हजार १०८ किलो मिरची पावडरचा साठा आढळून आला. तसेच चार हजार २७८ किलोची धने पावडर आढळून आली. मिरची पावडरची किंमत १६ लाख ६७ हजार ८२० रुपये इतकी असून, धने पावडरची किंमत दोन लाख ३५ हजार २९० इतकी आहे. हा साठा द्वारका, ईश्वर रेसिडेन्सी येथील मे. जे. सी. शहा अॅण्ड कंपनीचा असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन्ही पदार्थांचे नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रशासनाचे सहआयुक्त प्रमोद पाटील, सं. भा. नारागुडे, विनोद धवड, मनीष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात असेल तर त्याबाबतची माहिती प्रशासनाला कळवावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमधील शीतगृहावर धाड; लाखोंची मिरची, धने पावडर जप्त appeared first on पुढारी.