स्मशानभूमीत कणकेची बाहुली, लिंबू, टाचण्या, कवड्या; अंनिसने केली भिती दूर

दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी तालुक्यातील वलखेड या गावातील स्मशानभूमीत मागील चार-पाच दिवसांपूर्वी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने स्मशानभूमीत कणकेची बाहुली, लिंबू, टाचण्या, कुंकू , कवड्या, लाल धागा हे एका टोपलीत थेट सरणावर ठेवल्याने गावकऱ्यांच्या मनात भीती पसरली होती. ही भीती दूर करण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी करणीतील नारळ फोडत त्यातील पाणी सर्वांसमोर प्राशन करत गावकऱ्यांच्या मनातील भीती दूर केली.

स्मशानभूमीतील भीतीदायक प्रकार काही नागरिकांनी सरपंच विनायक शिंदे यांना सांगितला. त्यांनी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनाही याबाबत माहिती दिल्यानंतर स्वतः गोराणे यांनी गावातील नागरिकांना फोन करत वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच प्रत्यक्ष वलखेडला जाऊन या अघोरी पूजेची शहानिशा केली. डॉ. ठकसेन गोराणे, जिल्हा बुवाबाजी विरोधी संघाचे सचिव महेंद्र दातरंगे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष संतोष कथार, कार्याध्यक्ष संतोष विधाते, सरचिटणीस संदीप गुंजाळ, सदस्य अमोल जाधव, आनंदा शिंगाडे आदींनी पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांना भेटून तक्रार अर्ज दिला. या प्रकाराची सखोल चौकशी करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाईची मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली.

करणीचे नारळ फोडून पिले पाणी

 सरपंच शिंदे यांच्यासह अंनिसचे कार्यकर्ते प्रत्यक्ष वलखेड गावातील स्मशानभूमीत गेले. तेथे आणखी दुसऱ्या ठिकाणी अघोरी पूजेचे साहित्य सापडले. त्यातील बंडल, काडेपेटी, गांजाची पुडी, चिलीम, कोहळा, काळी बाहुली, अंडे, टाचण्या हे साहित्य गोळा केले. करणीचे नारळ फोडून त्यातील पाणी कार्यकर्त्यांनी सर्वांसमोर प्राशन करून अशा प्रकारे जादूटोणा, करणी, भानामती, काळी जादू असे काहीही नसते हे स्पष्ट करत उपस्थित महिला व पुरुषांचे प्रबोधन केले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जमा केलेले अघोरी पूजेचे सर्व साहित्य पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा :

The post स्मशानभूमीत कणकेची बाहुली, लिंबू, टाचण्या, कवड्या; अंनिसने केली भिती दूर appeared first on पुढारी.