३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी

वृक्ष तोड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे सुमारे २०० धोकादायक वृक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असून, या अपघातांमध्ये तब्बल ३२ जणांचा बळी गेल्यानंतर अखेर महापालिकेच्या उद्यान विभागाला जाग आली आहे. प्राथमिक सर्वेक्षणानंतर त्यापैकी ५० अतिधोकादायक वृक्ष हटविण्याची तयारी उद्यान विभागाने सुरू केली आहे. यातील काही पुरातन वटवृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार असून, एका वृक्षतोडीच्या बदल्यात पाच अशा प्रकारे नवीन वृक्षलागवड केली जाणार आहे.

नाशिकमध्ये वाढत्या लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येच्या तुलनेत विस्तीर्ण रस्ते झाले. परंतु या रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे वृक्ष मात्र कायम राहिले आहेत. पर्यावरणप्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध दर्शविल्यामुळे रस्ते रुंद करताना वाहतुकीला अडथळा ठरणारे वृक्ष मात्र तोडणे महापालिकेला शक्य झाले नव्हते. मात्र या वृक्षांमुळे आजवर अनेक अपघात झाले असून, त्यात ३२ जणांचा बळी गेला आहे, तर अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. अशा अपघातांचे ब्लॅक स्पॉट सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिकेसह जिल्हाधिकारी व पोलिसांना देण्यात आल्या होत्या. रेझिलिएन्ट इंडिया कंपनीमार्फत ४५ दिवस सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यात ब्लॅक स्पॉटवरील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. रस्त्यावर वाहतुकीला अडथळा ठरणारे वृक्ष अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

वृक्षांना धडकून रस्ते अपघातामध्ये ३२ जणांचा बळी गेल्याची बाब उद्यान विभागाच्या सर्वेक्षणामध्ये समोर आली आहे. जवळपास 200 धोकादायक वृक्ष असून, त्यापैकी किती वृक्षांना काढून त्यांचे पुनर्रोपण करावे लागेल याबाबत अभ्यास केला जात आहे.

– विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा.

हेही वाचा :

The post ३२ जणांचे बळी घेतले, ते ५० वृक्ष हटविण्याची तयारी appeared first on पुढारी.