एमबीए प्रथम वर्षाचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून परीक्षा रद्द

MBA परीक्षा पेपर फुटला ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे एमबीए प्रथम वर्ष प्रथम सत्रातील ‘लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस’ विषयाची परीक्षा शुक्रवारी (दि. २२) होती. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याची प्राथमिक माहिती समोर येताच विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा पेपर मंगळवारी (दि. २६) सकाळी १० ते १२.३० या वेळेत होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांमधील संलग्न महाविद्यालयातील सुमारे साडेसात लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते. ऑक्टोबर २०२३ या सत्राची परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरळीतपणे सुरू झाली. त्यात एमबीए अभ्यासक्रमाची परीक्षा ११ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. २२ डिसेंबर रोजी एमबीए २०१९ रिव्हाईज प्रथम सत्रातील लीगल आस्पेक्ट ऑफ बिझनेस विषयाची परीक्षा सकाळी 11 वाजता सुरू होणार होती. परंतु, परीक्षा सुरू होण्यापूर्वी या विषयाची प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे विद्यापीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :

 

The post एमबीए प्रथम वर्षाचा पेपर फुटला, विद्यापीठाकडून परीक्षा रद्द appeared first on पुढारी.