नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या रांगा

ब्रम्हगिरी पर्वत नाशिक www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा– पौषवारीनिमित्त आलेल्या लाखो वारकऱ्यांनी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचे पुण्य प्राप्त केले. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी सकाळपासून वारकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. (Brahmagiri Nashik)

वारकरी संप्रदायात ब्रह्मगिरी पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साक्षात शिवस्वरूप असलेल्या ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांना योगिराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांनी धाकटे बंधू ज्ञानेश्वर माउलींना गुरुप्रसाद दिला. आदिनाथांपासून आलेली गुरुपरंपरा पुढे सुरू राहिली आणि भागवत धर्माची भगवी पताका दिगंतरा पोहोचली. शेकडो किलोमीटर पायी चालत आलेले वारकरी दिंडी मुक्कामावर अगदी थोडा वेळ थांबतात आणि ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला अथवा ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीच्या उगम स्थानाकडे जातात. त्याप्रमाणे दिवसभर वारकऱ्यांची धावपळ सुरू होती. (Brahmagiri Nashik)

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा मार्ग अहोरात्रौ गर्दीने वाहात आहे. भगव्या पताका आणि टाळ-मृदंगासह हरिनामाने परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी लांबच लांब रांग लागली आहे. भातखळापर्यंत गेलेले भाविक पुढे पायऱ्यांच्या मार्गावर गर्दी झाल्याने थांबवण्यात येत आहेत. जिन्यात तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. वनविभागाचे कर्मचारी रात्रंदिवस गर्दीचे नियंत्रण करत आहेत. गर्दी पाहून भाविक भातखळ्याच्या बाजूने असलेल्या गंगाद्वारकडे  मार्गक्रमण करत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिकच्या ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी वारकऱ्यांच्या रांगा appeared first on पुढारी.