नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाचा पर्यटन विभागाच्या वतीने बुधवार (दि. २८) पासून पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका या ठिकाणी दि. 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात स्थानिक कलावंतांसह सिनेनाट्य कलावंतांकडून गीते, नाटके यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. महोत्सवातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांना प्रवेश विनामूल्य असून, जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.

स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चाललेल्या कला, संस्कृतीचे जतन व संवर्धन तसेच स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पाचदिवसीय महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

महासंस्कृती महोत्सवाचे कार्यक्रम असे…
▪️ बुधवारी (दि. २८) सायंकाळी 4 ते 5 या वेळेत महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत लेकी जिजाऊंच्या कार्यक्रम, ६ ते ७ निवृत्ती चव्हाण महाराज यांचे कीर्तन व ६ ते १० या वेळेत महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम सादर होईल.
▪️ गुरुवारी (दि. २९) सायंकाळी ४ ते ५ या वेळेत श्यामची आई या नाटकाचे सादरीकरण, ५ ते ६.३० या वेळेत कलगीतुरा नाटकाचे सादरीकरण आणि ६.३० ते १० या वेळात नवदुर्गा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण
▪️ शुक्रवारी (दि. १ मार्च) सायंकाळी 4 ते 5 या वेळेत लता मंगेशकर यांना आदरांजली हा मराठी गीतांचा कार्यक्रम. 5 ते 6 या वेळेत मालेगावचे श्रावण अहिरे महाराज यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी 6 ते 7 या वेळेत मैदानी खेळ व दांडपट्टा लाठीकाठी रिंग व लेजीमचे सादरीकरण. 7 ते 10 मराठी नाटक कुरर्रचे सादरीकरण.
▪️ शनिवारी (दि. 2) सायंकाळी 4 ते 5 या वेळेत गजर हरिनामाचा नृत्य नाटिकेचे सादरीकरण, सायंकाळी 5 ते 6 या वेळेत मल्लखांब प्रात्यक्षिके होतील. आम्ही महाराष्ट्राच्या लेकी हा कार्यक्रम सायंकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. 7 ते 10 या वेळेत ऊर्जा बॅण्ड गीतांचा व नृत्यांचा कार्यक्रम होईल.
▪️ रविवारी ( दि. 3) सायंकाळी 4 ते 5.30 या वेळेत सनई, संभळ वादन कार्यक्रम, आदिवासी नृत्य, पावरा नृत्य, शेवंती नृत्य, कांबडा नृत्य, लावणी, लोककला अशा विविध लोकप्रकारांचा जुगलबंदी कार्यक्रम होईल. सायंकाळी 5.30 ते 6.15 कविसंमेलन. समारोप 6.15 ते 7.15 या वेळेत होईल. त्यानंतर सांयकाळी 7.15 ते 10 या वेळेत मी सह्याद्री बोलतो- शिवराज्याभिषेक सोहळा सादर होईल.

हेही वाचा:

The post नाशिककरांना आजपासून विनाशुल्क मिळतेय सांस्कृतिक मेजवानी appeared first on पुढारी.