आरक्षणासाठी साजरी करणार काळी दिवाळी

मराठा आरक्षण बैठक नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळला असून, राज्यभर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात येत असलेल्या बैठका निष्फळ ठरत असल्याने, मराठा समाजाकडून आंदोलन आणखी तीव्र केले जात असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी (दि.१) जिल्हा न्यायालयासमोरील शिवतीर्थ येथे घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत यंदा कोणीही दिवाळी साजरी करणार नसल्याचा एकमुखी ठराव करण्यात आला आहे. काळी दिवाळी साजरी करून आरक्षणाची मागणी लावून धरली जाणार आहे.

गेल्या ५९ दिवसांपासून सकल मराठा समाजाकडून शिवतीर्थावर साखळी उपोषण केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून नाना बच्छाव पूर्णवेळ आमरण उपोषणाला बसले असून, याच ठिकाणी समाजाची बैठक घेतली जावी, अशी भूमिका सरपंच परिषदेने मांडली होती. त्यानुसार घेण्यात आलेल्या या बैठकीत राजकीय जोडे बाहेर ठेवून विविध पक्षाचे पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक करताना प्रफुल्ल वाघ यांनी मराठा म्हणून आपण आपली मते मांडावीत अशी सूचना केली.

यावेळी दत्ता गायकवाड, दिनकर पाटील, सुधाकर बडगुजर, करण गायकर, विलास शिंदे, बंटी भागवत, शिवाजी सहाणे, भागवत आरोटे, प्रताप मेहेरोलिया, प्रकाश लोंढे सुरेश मारू, डॉ. स्वप्ना राऊत, वत्सला खैरे, पूजा धुमाळ, पूनम पाटील, अॅड. महेश आहेर, पूजा धुमाळ, पूनम पाटील, अॅड. खरोटे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्नांची पराकाष्टा करावी, अशा भावना व्यक्त केल्या. अॅड. महेश आहेर यांनी, ‘मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यास आम्ही वकील न्यायालयीन खटले लढू’, असे स्पष्ट केले.

त्याचबरोबर मराठा समाजाला छळणाऱ्या राजकारण्यांचे सत्तास्थान हलविल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमच्या तरुणांच्या वाढत्या आत्महत्या व मनोज जरांगे पाटील यांच्या खालवलेल्या प्रकृतीला सरकारच जबाबदार असून, आमचा अंत पाहू नका असा इशाराच याप्रसंगी मराठा समाजाकडून देण्यात आला. यावेळी नेत्यांनी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेवून आरक्षणाची बाजू लावून धरल्याचे दिसून आले. बैठकीस चंद्रकांत बनकर, राम खुर्दळ, प्रफुल्ल वाघ, नितीन रोटे-पाटील, योगेश कापसे, सचिन पवार, अॅड. तुषार जाधव, श्रीराम निकम, महेंद्र बेहेरे, विकी गायधनी गणेश पाटील आदी उपस्थित होते.

नेतेगिरी करू नये

मंत्री, आमदार, खासदार यांनी आरक्षणासाठी संसद, विधीमंडळात आवाज उठवावा. उगाचच आंदोलनाच्या नावे नेतेगिरी करू नये. मनोज जरांगे-पाटील यांच्या सूचनेनुसार यापूढेही आंदोलनाची दिशा शिवतीर्थावरून निश्चित केली जाणार आहे. राजकारण्यांनी आंदोलनात सहभागी होताना आपले राजकीय जोडे काढून यावे, अशा शब्दात उपस्थित राजकारण्यांना मराठा समाजाकडून खडेबोल सुनावण्यात आले.

आत्महत्या करू नका

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अनेक तरुण आत्महत्या करीत आहेत. आरक्षण मिळणारच असून, कोणीही आत्महत्या करू नये, अशी विनवणी राजकीय मंडळींकडून करण्यात आली. तसेच हिंसक आंदोलन न करता शांततेच्या मार्गाने आंदोलने करून सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडू असाही सूर राजकारण्यांकडून व्यक्त केला गेला.

पोलिसांचा फौजफाटा

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता. यावेळी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी मराठा बांधवांनी अत्यंत शांततेत आपल्या मते मांडली. तसेच हिंसकतेचे आम्ही समर्थन करणार नसल्याचेही स्पष्ट केले.

गुटखाकिंग समन्वयक कसा?

काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात गुटखा विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. यामध्ये नाशिकमधील एका नावाजलेल्या व्यक्तीचे नाव गुटखाकिंग म्हणून पुढे आले होते. हा व्यक्ती बैठकीस आला असता, मराठा बांधवांनी हातात फलक घेवून ‘गुटखाकिंग, तोडीबाज आणि स्वयंघोषित स्वमन्वयकाने समाजाचे पुढारपण करू नये’ अशा आशयाचे फलक हाती घेतले. काहींनी यास विरोध केल्यानंतर फलक हटविण्यात आले.

हेही वाचा :

The post आरक्षणासाठी साजरी करणार काळी दिवाळी appeared first on पुढारी.