नाशिक : पुढारी वृत्तसेवा – भद्रकालीतील पुर्वाश्रमीची व्हिडीओ गल्ली पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. या ठिकाणी अवैध धंदे चालकांनी पुन्हा बस्तान बसवण्यास सुरुवात केली आहे. भररस्त्यात टेबल मांडून त्यावर मटक्याचे खेळ मांडले आहेत. त्यामुळे परिसरात जुगाऱ्यांचा वावर वाढला असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक व इतर व्यावसायिकांना होत असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे याकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्षही चर्चेचा विषय बनला आहे.
भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकेकाळी कुप्रसिद्ध असलेली व्हिडीओ गल्ली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तत्कालीन पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई झाल्याने ते बंद झाले होते. त्यामुळे स्थानिकांसह इतर व्यावसायिकांना दिलासा मिळाला हाेता. मात्र काही दिवसांपासून परिसरातील अवैध धंदे पुन्हा खुलेआम सुरु झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. अवैध धंदे चालकांनी परिसरातील रस्त्यात टेबल मांडले आहेत. त्यावर खुलेआम अवैध जुगाराचे डाव मांडले असून युवावर्गाचा घोळका टेबलाभोवती दिसत आहे. तर काही मोठ्या रकमेचा जुगार खेळण्यासाठी आतमध्ये प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्याचेही आढळून आले. त्यात कुलर, एसीचीही व्यवस्था असल्याचे दिसते. त्यामुळे युवावर्गास जुगाराकडे वळवण्याचे प्रकार खुलेआम सुरु झाल्याचे दिसते.
- जुगाऱ्यांमध्ये वादाचे अनेक प्रसंग
- सर्वसामान्य नागरिक व स्थानिकांसह व्यावसायिकांना याचा फटका
- नागरिकांकडून संताप व्यक्त होत असून जुगार अड्ड्यांमुळे व्यवसाय होत नसल्याच्या तक्रारी
पोलिस अनभिज्ञ
याबाबत भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासोबत संपर्क साधला असता ते दहा दिवसांपासून रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रभारी निरीक्षक नरुटे हे जुगार अड्ड्यांबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने संबंधित ठिकाणी पथक पाठवतो असे सांगितले. त्यामुळे खुलेआम सुरु असलेला मटका अड्डा पोलिसांच्या नजरेत का भरला नाही अशी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: