नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महाविजय अभियानासाठी अल्पसंख्याक कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना अल्पसंख्याकांपर्यंत पोहोचविताना लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी अल्पसंख्याक मतांचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुल्तानी यांनी केले.
भाजपच्या ‘वसंतस्मृती’ कार्यालयात अल्पसंख्याक मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक मुल्तानी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. मुल्तानी म्हणाले की, लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कार्य करावे. पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये बूथ लेव्हलपर्यंत सहभाग नोंदवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गत नऊ वर्षांच्या सत्ताकाळातील जनविकासाच्या योजनांची माहिती अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचवावी. बूथस्तर, मंडलस्तर, शहरस्तर तसेच विभागस्तरावर नियमित बैठकांचे आयोजन करावे. या बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रवाहात आणावे, असे आवाहन करताना लवकरच भाजप अल्पसंख्याक मुस्लीम महिला महामेळावा व पसमंदा समाज महामेळावा नाशिक मध्ये घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
प्रदेश उपाध्यक्ष तथा हज कमिटी सदस्य सलिम बागवान, प्रदेश सरचिटणीस एजाज शेख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. महानगराध्यक्ष आरिफ काझी यांनी प्रास्ताविक केले. जलिल अन्सारी यांनी सूत्रसंचालन केले, तर फिरोज शेख यांनी आभार मानले. व्यासपीठावर भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव, पप्पू शेख, अकबर शहा, नाशिक महानगर सरचिटणीस सुनील केदार, ॲड. श्याम बडोदे, रोहिणी नायडू, अल्पसंख्याक मोर्चा उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख मुझम्मील मिर्झा, माजी नगरसेविका शाहिन मिर्झा, सलिम मिर्झा आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- Nashik Citylink : भाडेवाढीसाठी सिटीलिंकची धडपड, शासनाला प्रस्ताव सादर
- Pune News : दोन महिन्यांत महापालिकेत शंभर टक्के ई-ऑफिस प्रणाली
- विद्या प्राधिकरणाला प्रश्नपेढीचा विसर; संकेतस्थळावर गतवर्षीच्याच प्रश्नपत्रिका
The post भाजपसाठी अल्पसंख्याक मतांचा टक्का वाढवा : मुल्तानी appeared first on पुढारी.