नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा- छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता सध्या राजकीय वर्तुळात व्यक्त होते आहे. भाजप किंवा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते. मात्र, त्यांना उमेदवारी देऊ नये या मागणीसाठी नाशिक तालुक्यातील काही गावांमध्ये सकल मराठा समाजाने ठीक ठिकाणी होर्डिंग उभारण्यास सुरुवात केली आहे. अर्थात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून उभारलेले होर्डींग काढले आहे. त्यामुळे काहीवेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी होर्डींग काढले असले तरी नाशिक तालुक्यातील प्रत्येक गावात अश्या स्वरूपाचे होर्डींग उभारले जाणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजातर्फे दिला जातो आहे.
मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळू नये, तसेच त्याविरोधात महाराष्ट्रात ठीक ठिकाणी सभा घेऊन छगन भुजबळ यांनी विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात देखील भुजबळ यांनी वैयक्तिक पातळीवर जात एकेरी टीका केली होती. भुजबळ हे सतत मराठा आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात भुजबळ विरुद्ध सकल मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असताना भुजबळ यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात केली जात आहे. यामागे भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी व्युहरचना आखल्याचे बोलले जात आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू होताच येथील सकल मराठा समाजाने भुजबळांना उमेदवारी मिळू नये, यासाठी गाव पातळीवर होर्डींग उभारून भुजबळांच्या उमेदवारीला विरोध करत भाजप व राष्ट्रवादी समोर दबाव तंत्राचा वापर सुरू करण्यास सुरुवात केली आहे. सध्या नाशिक तालुक्यातील दोन ते तीन गावांमध्ये अशा प्रकारचे होर्डींग दिसून येत असून यापुढे प्रत्येक गावात आम्ही होर्डींग उभारू, असा इशारा येथील सकल मराठा समाजा तर्फे दिला जातो आहे.
दरम्यान वादग्रस्त होल्डिंगमूळे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये ,यासाठी पोलिसांनी ततातडीने होर्डींग काढले आहे. संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. – रामदास शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नाशिकरोड पोलिस ठाणे
हेही वाचा :
- Mukhtar Ansari Death : मुख्तार अन्सारीला तुरूंगात जेवणातून विष दिले: मुलाच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश
- Pushpa 2: The Rule : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची टिझर रिलीजची तारीख ठरली
- Loksabha election 2024 : शिरूरला सक्षम पर्याय आहे का?
The post भुजबळांच्या उमेदवारीची नुसती चर्चा तरी, नाशिकमध्ये झळकले गावबंदीचे बॅनर appeared first on पुढारी.