नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीतील नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीकडून उमेदवारीसाठी भुजबळांचे नाव आघाडीवर असले तरी, त्याबाबतची अधिकृत घोषणा अद्यापपर्यंत केली गेलेली नाही. अशातच आता, छगन भुजबळांनी केलेल्या नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांणा उधाण आले आहे.
नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीकडे केली असता, ‘तुम्हाला ही जागा घ्यायची असेल तर घ्या, मात्र तिथून छगन भुजबळ यांनाच उमेदवारी द्या,’ अशी सूचना थेट दिल्लीतून अजित पवार आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना देण्यात आल्याचा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे. तसेच कमळ चिन्हावर लढणार असल्याबाबतच्या बातम्या खोट्या असल्याचा उलगडाही भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.
नाशिकच्या जागेवर शिवसेना शिंदे गटासह भाजप आणि राष्ट्रवादी दावा ठोकून असल्याने, या जागेचा पेच आणखीनच वाढत आहे. दरम्यान, भुजबळांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता असून, त्यांचे नाव दिल्लीतूनच निश्चित झाल्याचे खुद्द भुजबळांनीच स्पष्ट केले आहे. आता त्यांनी आणखी नवा दावा केल्याने, महायुतीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भुजबळांच्या मते, ‘नाशिकच्या जागेची मागणी अजित पवार यांनी केली. मात्र, ती जागा घ्यायची असेल तर, छगन भुजबळांनाच तेथून उमेदवारी द्या’ अशा स्पष्ट सूचना थेट दिल्लीतून देण्यात आल्या आहेत. यापेक्षा मी काहीही सांगू शकत नाही.’ तसेच भुजबळ कमळ चिन्हावरून निवडणूक लढवणार असल्याबाबत विचारले असता, ‘ही सगळी खोटी बातमी आहे. त्याला कशाचाही आधार नाही. या चिन्हावर, त्या चिन्हावरच लढा यासाठी माझ्याकडे कोणी मागणी वा विचारणा केलेली नाही. तशी अटही टाकली नसल्याचे सांगत ही चर्चा त्यांनी फेटाळून लावली. तुमच्या नावाची घोषणा कधी होणार असे विचारले असता, जेव्हा करायची तेव्हा करतील. महायुतीचे सगळे लोक ठरवतील. आपली निवडणूक शेवटी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा –
- Jalgaon News | लिफ्ट मागणाऱ्यानेच शेतकऱ्याला लुटले, दीड लाखांचा ऐवज घेऊन झाला फरार
- व्हिएतनाममध्ये अब्जाधीश महिलेला भ्रष्टाचारप्रकरणी सुनावली फाशी
The post भुजबळांनाच उमेदवारी द्या, अजित पवारांना दिल्लीतून सूचना appeared first on पुढारी.