मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकला संधी? आमदार सीमा हिरे यांच्या नावाची चर्चा

आमदार सीमा हिरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव झाल्यानंतर महायुतीमधील घटक पक्ष आणि अंतर्गत हेव्यादाव्याची चर्चा सुरू असतानाच राज्याच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार सीमा हिरे यांना संधी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. लोकसभेला नाशिकच्या तीनही भाजप आमदारांच्या मतदारसंघात मिळालेल्या एकूण मतांच्या तुलनेत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गोडसे यांना सर्वाधिक मतदान मिळाल्याने आ. हिरे यांच्या नावाला पसंती असल्याचे सांगितले जात आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शहरातील भाजपच्या ताब्यात असलेल्या तीन विधानसभा मतदारसंघांनी गोडसे यांना हात देण्याचा प्रयत्न केला असला तरी आमदार सीमा हिरे व आमदार राहुल ढिकले यांच्या अनुक्रमे नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व या दोन मतदारसंघांत गोडसेंना आघाडी मिळाली आहे. आ. देवयानी फरांदे यांच्या नाशिक मध्य मतदारसंघात विजयी उमेदवार वाजे यांना गोडसे यांच्यापेक्षा ३८०६ मतांची आघाडी मिळाल्याने या मतदारसंघात गोडसे पिछाडीवर राहिले आहेत.

नाशिक पश्चिम, नाशिक मध्य आणि नाशिक पूर्व हे तीन विधानसभा मतदारसंघ मागच्या सलग दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे गड राहिलेले आहेत. खरंतर या तिन्ही मतदारसंघांवरच राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांची मदार होती. त्यामुळे दोन्ही उमेदवार व त्यांच्या पक्षांनी या तिन्ही मतदारसंघांत सर्वार्थाने जोर लावलेला होता. मात्र, त्यातही नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघांतून गोडसे यांना तब्बल ३१ हजार २१० मतांची आघाडी मिळाली. तर नाशिक पूर्व मधून १० हजार ४०० मतांची आघाडी मिळाली.

एकूणच महाराष्ट्राच्या सर्वच विभागातून महायुतीला बसलेल्या अपयशाच्या फटक्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळू नये यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचालींनी वेग घेतला असून, केंद्रातील सत्ता स्थापनेपाठोपाठ तातडीने राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा घडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नाशिकच्या वाट्याला मंत्रिपद मिळण्याची शक्यता वाढली आहे. मागील मंत्रिमंडळ विस्तारावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह आमदार राहुल ढिकले व आमदार राहुल आहेर यांचीही नावे चर्चेत होती. मात्र, त्यावेळी चर्चा होऊनही मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने नाशिकची संधी हुकली. मात्र आता नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

तीन महिन्यांचे मंत्रिपद

लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. साधारणपणे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि नवीन चेहेऱ्यांना संधी मिळाली तरी अवघ्या तीन महिन्यांसाठी मिळणारी ही संधी औट घटकेचीच ठरणार आहे यात शंका नाही.

———————–