धुळे पुढारी वृत्तसेवा; धुळ्यातील शाळा क्रमांक नऊ मध्ये मतदान यंत्राचा फोटो काढल्यानंतर धावपळ झाली. यात झालेल्या दगडफेक प्रकरणात आता जमावाच्या विरोधात दंगल आणि सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आज पोलीस दलाने संवेदनशील भागांमधून रूट मार्च काढून जनतेला शांतता राखण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.
धुळे लोकसभेसाठी सर्व सहा मतदारसंघांमध्ये शांततेत मतदान झाले. विशेषतः धुळे शहरांमधील बऱ्याच मतदान केंद्रावर मतदारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. धुळे लोकसभेचे मतदान निर्भयपणे व्हावे यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी गेल्या दोन महिन्यांपासून नियोजन केले होते. यात उपद्रवी व्यक्तींवर आवश्यक ती कारवाई करण्यात आली. तसेच या निवडणूक प्रचाराच्या काळात अवैध शस्त्र धारक आणि अवैध दारू प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले. तर मतदानाच्या दिवशी सर्वच मतदान केंद्रावर बंदोबस्ताची आवश्यक ती काळजी घेण्यात आली. दरम्यान मतदान सायंकाळी सहा वाजेपर्यंत शांततेत पार पडले. मात्र शाळा क्रमांक 9 च्या केंद्रावर एक किरकोळ प्रकार घडल्याने धावपळ उडाली. यातून ताशा गल्ली परिसरात गैरसमज पसरला. काही तरुणांनी किरकोळ दगड फेकले. त्यामुळे तणावाची स्थिती देखील निर्माण झाली. हा प्रकार काही मिनिटांमध्येच नियंत्रणात आला. तसेच ही गैरसमजातून घडलेली कृती असून यात कोणताही जातीय तणाव नसल्याचा खुलासा देखील पोलीस प्रशासनाने केला. त्यामुळे धुळ्यात अफवा पसरणे थांबले. या प्रकरणात आता आझाद नगर पोलीस ठाण्यात आगळीक करणाऱ्या जमावाच्या विरोधात दंगल तसेच सार्वजनिक मालमत्ता विद्रोपीकरण, मुंबई पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आज सायंकाळी उपअधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली जय जवान चौकापासून संचलन करण्यात आले. हे संचलन किसान बत्ती वाला खुंट, मिरच्या मारुती, मच्छी बाजार चौक मार्गे भोलाबाजार तसेच तेथून रामदेव बाबा नगरापर्यंत संचलन करण्यात आले .या संचलना दरम्यान नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा –