वर्षभरात ३०५ गुंतवणूकदारांना २१ कोटींचा गंडा

गुंतवणूकदारांना गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आकर्षक योजनांच्या आमिषाला बळी पडल्याने वर्षभरात शहरातील ३०५ गुंतवणूकदारांना भामट्यांनी तब्बल २१ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी शहरात नऊ गुन्हे दाखल झाले असून, 11 संशयितांना अटक झाली आहे. त्याचप्रमाणे ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायद्यानुसार (एमपीआयडी) सहा गुन्हे दाखल केले असून संशयितांच्या १८ मालमत्ता गोठवण्यात आल्या आहेत.

कमी कालावधीत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामटे नागरिकांना फसवतात. याप्रकारे दरवर्षी कोट्यवधींची फसवणूक होत आहे. मात्र त्यापैकी काही पीडित व्यक्ती पोलिसांकडे तक्रार करण्यास येत नसल्याने फसवणुकीचा निश्चित आकडा कधीच समोर येत नाही. गतवर्षी कलकाम घोटाळा उघडकीस आला होता. त्यात गुंतवणूकदारांना तीन कोटी ९१ लाख ५० हजार ३५९ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यात ९०३ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच या गुन्ह्यांत संशयितांच्या ११ मालमत्ता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. दरम्यान, चालू वर्षात २० कोटी ९१ लाख २ हजार ४५० रुपयांचे सहा घोटाळे उघड झाले आहेत. त्यात जादा परतावा देणाऱ्या योजनांसह शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे समोर आले आहे.

एमपीआयडी अंतर्गत गुन्हे

चालू वर्षात आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यांपैकी सहा गुन्ह्यांमध्ये एमपीआयडी अंतर्गत कारवाई केली आहे. त्यात रिअल रिचार्ज मार्केटिंग, क्रिप्टो कॉइन, शेअर मार्केट, आदिशक्ती, आर. आर. वल्ड, अँल्गो ऑप्शन ट्रेडिंगमार्फत गंडा घालणाऱ्या संशयितांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करीत १८ मालमत्ता जप्त केल्या आहेत.

विविध स्वरूपांच्या गुंतवणुकीसह कमी कालावधीत जादा नफ्याचे आमिष दाखविण्याचे प्रकार वाढले आहेत. अल्पावधीत श्रीमंत होण्याच्या उद्देशाने लाखो रुपये गुंतवल्यानंतर फसवणूक उघड होते. त्यामुळे नागरिकांनी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी.

– भगीरथ देशमुख, सहायक पोलिस आयुक्त, आर्थिक गुन्हे

हेही वाचा :

The post वर्षभरात ३०५ गुंतवणूकदारांना २१ कोटींचा गंडा appeared first on पुढारी.