कुंभमेळ्याचे नियोजन अधिकारी-मंत्र्यांना घेऊनच करा- साधू संतापले

कुंभमेळा नाशिक

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा- सिंहस्थ आगमनाचा शंखध्वनी राज्य सरकारने गुरुवारी (दि.14) कुंभमेळा नियोजनासाठी शिखर समितीसह अन्य तीन समित्यांच्या घोषणेने केला. तथापि या समित्यांमध्ये कुंभमेळा ज्यांच्यामुळे भरतो त्या साधूंच्या आखाडा परिषदेचा उल्लेखही नसल्याने साधू-महंतांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. शासनाने सिंहस्थ कुंभमेळा अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांना घेऊनच करावा, अशा शब्दांत टीकाटिप्पणी होत आहे. (Nashik Kumbh Mela 2027)

महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी याबाबत तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला आहे. शासन साधूंना विश्वासात न घेता कुंभमेळा नियोजन करणार असेल तर सिंहस्थ शाहीस्नानही अधिकारी आणि राजकीय नेते यांनीच करावे, अशी भावना नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यांनी व्यक्त केली आहे. दर बारा वर्षांनी महाराष्ट्रात केवळ नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होतो. त्र्यंबकेश्वर येथे शैव साधू संन्याशांचे 10 आखाडे आहेत, तर नाशिक येथे वैष्णव साधूंचे तीन आखाडे आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात शैव साधूंचे शाहीस्नान त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तावर होते आणि वैष्णव साधूंचे शाहीस्नान नाशिक येथे रामकुंडावर होते. कुंभमेळ्यात सर्व आखाड्यांच्या देवता, साधू-संत भक्त येतात. त्यांच्यासाठी सोयी-सुविधा शासन निर्माण करते. (Nashik Kumbh Mela 2027)

शासनाने कुंभमेळ्याचे (Nashik Kumbh Mela 2027) नियोजन करताना अखिल भारतीय आखाडा परिषदेला आणि पर्यायाने प्रत्येक आखाड्याला विचारात घेणे आवश्यक आहे. साधू-संतांना पर्यायाने आखाड्यांना सिंहस्थात काय हवे, नको, याचा विचार होणार नसेल तर सिंहस्थ कुंभमेळा कोणासाठी असतो याचे भान शासनाला नसावे, असे मत येथील साधू-महंतांनी व्यक्त केले. तसेच शिखर समिती आणि अन्य तीन समिती यांच्यामध्ये जाहीर झालेल्या नावांचा उल्लेख पाहता मागच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे नियोजनाची झालेली धरसोड, अनावश्यक खर्च आणि आवश्यक खर्चाला कात्री यासारखे प्रकार पुन्हा होणार असतील तर नकोच तो सिंहस्थ कुंभमेळा, अशी भावना साधूंनी आणि येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. 

मागच्या 30 वर्षांपासून सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी स्वतंत्र सिंहस्थ मेळा प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी आहे. यामागे दर कुंभमेळ्यात नियोजनाचा बोजवारा आणि विकासकामांचा बट्ट्याबोळ होऊ नये, यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची मागणी होत आहे. त्र्यंबक नगर परिषद क वर्ग नगरपालिका आहे. ब्रिटिशांनी तत्कालीन गरज म्हणून स्थापन केलेल्या या नगर परिषदेकडे विकासकामे राबविताना स्वतःची यंत्रणा नाही. मागच्या वर्षापासून प्रशासकीय कारभार आहे. साहजिकच कुंभमेळा नियोजन वगैरे बासनात आहे. यासाठी त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या दोन ठिकाणांसाठी स्वतंत्र आय. ए. एस. दर्जाचे मेळा अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी आहे. गत सिंहस्थात कोट्यवधींचा निधी अखर्चित राहिला व परत पाठवला. यासाठी नियोजनपूर्वक आणि आवश्यक ती कामे झाली पाहिजे.

शिखर समितीवर त्र्यंबकेश्वर, नाशिक अशा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्रत्येक आखाड्याच्या साधूला प्रतिनिधित्व द्यावे. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या साधूंची शासनाने जाहीर केलेल्या शिखर समितीला मान्यता नाही. आखाड्यांच्या साधूंना विचारात न घेता सिंहस्थ कुंभमेळा कोणासाठी करायचा आहे याचा विचार झाला पाहिजे. – महंत शंकरानंद सरस्वती महाराज, कोषाध्यक्ष आखाडा परिषद

शासनाने समिती जाहीर करताना त्यात साधू आखाड्यांचा उल्लेख करणे आवश्यक होते. नियोजनासाठी आखाड्यांना विश्वासात घ्यावेच लागेल अन्यथा सिंहस्थ म्हणजे केवळ विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करायचा यासाठी हा प्रयास आहे, असे दिसते. महंत उदयगिरी महाराज, सेक्रेटरी अटल आखाडा

हेही वाचा :

The post कुंभमेळ्याचे नियोजन अधिकारी-मंत्र्यांना घेऊनच करा- साधू संतापले appeared first on पुढारी.