ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण

देवयानी फरांदे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- एमडी प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत केलेले आरोप चुकीचे असल्याचे स्पष्ट करत राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत आ. फरांदे यांची पाठराखण केली आहे. ड्रग्ज प्रकरणाशी फरांदे यांचा दुरान्वयेही संबंध नाही. त्यामुळे जे आरोप केले जात आहेत ते चुकीचे आहेत, असे नमूद करत त्यास वेगळ्या प्लॅटफॉर्मवरून उत्तर द्यावे, असेही फडणवीस यांनी सूचित केले आहे.

नाशिकमध्ये सध्या ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या ड्रग्जमाफिया ललित पाटीलची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित ‘छोटी भाभी’ हिलाही अटक केली आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटातील काही नेत्यांचे संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर ठाकरे गटाकडूनही ‘छोटी भाभी’ला भाजप आमदाराचा राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षरीत्या आमदार फरांदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेतही याचा उल्लेख करत अंधारे यांनी एक पत्र माध्यमांसमोर सादर केले. या आरोपांबाबत आमदार फरांदे यांनी शुक्रवारी (दि.15) विधानसभेत प्रश्न उपस्थित केला.

ड्रग्ज प्रकरणी गृहखात्याकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत फरांदे म्हणाल्या की, अंधारे यांनी पत्रकार परिषदेत माझे नाव न घेता छोटी भाभी, मोठी भाभी असा उल्लेख करत या ड्रग्ज रॅकेट प्रकरणी माझ्याकडे निर्देश करत आरोप केले. तसेच मीडियाला एक पत्र दिले. ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुठलेही पुरावे नसताना बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावर गृहमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ड्रग्ज प्रकरणाशी फरांदे यांचा दुरान्वयेही संबध नाही. त्यामुळे जे काही आरोप केले जाताहेत ते चुकीचे आहेत. त्याबाबत वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून उत्तर द्यावे, असेही फडणवीस यांनी सूचित केले.

व्यसनमुक्ती केंद्र सुरू करणार : फडणवीस (Devendra Fadnavis)

राज्यात ड्रग्ज रॅकेटचा नायनाट करण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रे सुरू करावीत तसेच या केंद्रांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्याची आग्रही मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी सभागृहात केली. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री तथा फडणवीस म्हणाले की, व्यसनमुक्ती केंद्रांबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

हेही वाचा :

The post ड्रग्ज प्रकरणात फडणवीसांकडून फरांदे यांची पाठराखण appeared first on पुढारी.