मनमाड: पुढारी वृत्तसेवा– अठराव्या लोकसभेच्या निवडणूकीसाठी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील मनमाडला नागरिकांनी उस्फुर्तपणे मतदान केले. तापमानात मोठी वाढ होऊन देखील नागरिक मतदानासाठी बाहेर पडल्यामुळे शहरात सुमारे 57 टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. (Dindori Lok Sabha Voting)
निवडणुकीत महायुतीच्या डॉ. भारती पवार आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होत आहे. या दोघासह इतर सर्व उमेदवारांचे खासदारकीचे भवितव्य एव्हीएम मध्ये बंद झाले. शहरातील सर्वच मतदान केंद्रावर सकाळी सुरुवातीला संथ गतीने मतदान सुरु होते. मात्र 12 वाजेनंतर मतदार घराबाहेर पडण्यास सुरुवात होताच मतदान केंद्रावर लांबलचक रांगा लागल्या. महायुती आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते धावपळ करताना दिसत होते. मतदानासाठी भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना आज सुट्टी देण्यात आली होती. (Dindori Lok Sabha Voting)
गेल्या महिना भरापासून सूर्य नारायण आग ओकत आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन पारा 41 अंशापर्यत गेलेला आहे. आज देखील हीच परिस्थिती होती. कडक ऊन आणि उष्म्याने नागरिक हैराण असतानाही मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला. पालिका प्रशासनातर्फे सर्वच मतदान केंद्रावर सावलीसाठी मंडप टाकण्यात आले होते. शिवाय पाण्यासह इतर सुविधा देण्यात आल्या होत्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे किरकोळ कुरबुर वगळता मतदान शांततेत पार पडले. काही भागात अनेक मतदारांचे यादीत नाव नव्हते त्यामुळे त्यांचा हिरमोड होऊन त्यांनी नाराजी व्यक्त केली. (Dindori Lok Sabha Voting)
कांद्याचा मुद्दा गाजला
यंदाच्या निवडणूकित सर्वात जास्त कांद्याचा मुद्दा गाजला आहे त्यामुळे केंद्राने कांद्या बाबत घेतलेल्या निर्णयाचा फटका डॉ. भारती पवारांना कितपत बसतो.. शेतकऱ्यांची नाराजी भास्कर भगरे यांच्या पथ्यावर पडणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात असून या सर्व प्रश्नाचे उत्तर 4 जून रोजी मतमोजणीतुन मिळणार आहे.
सुहास कांदे यांनी केला दावा
महायुतीच्या डॉ. भारती पवार पुन्हा विक्रमी मतांनी बाजी मारतील. त्यांना नांदगाव मतदार संघातून नक्कीच लीड मिळणार असल्याचा दावा आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. तर या निवडणुकीत बदल घडणार असून महाविकास आघाडीचे भास्कर भगरे विजयी होतील, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा –