मविआच्या कार्यकर्त्यांना लक्ष्मीदर्शनाला आळा घालण्याचे प्रशिक्षण

100 रुपये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– मतदानापूर्वी शेवटचे दोन दिवस प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पैशांचा पाऊस पाडला जाणार असल्याने सतर्क राहण्याच्या सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना गुरुवारी (दि. १६) लक्ष्मीदर्शनाला आळा कसा घालावा, याचे चक्क प्रशिक्षणच देण्यात आले. प्रतिस्पर्धी उमेदवार आणि त्यांच्या पक्षनेते, पदाधिकाऱ्यांवर कशा पद्धतीने नजर ठेवायची, कोणी पैसे वाटप करताना दिसला, तर त्याचा व्हिडिओ काढून निवडणूक आयोगाला कसा पाठवायचा यासंदर्भातील धडे या बैठकीत देण्यात आले.

नाशिक लोकसभा मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार रिंगणात असले, तरी खरी लढत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे आणि शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांच्यातच होत आहे. एकीकडे गोडसेंच्या तुलनेत उमेदवारी महिनाभर आधी जाहीर झाल्यामुळे वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतली असली, तरी गोडसेंच्या विजयासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गोडसे यांच्या प्रचारार्थ गेल्या 10 दिवसांत तीन वेळा नाशिकचा दौरा केला आहे. दि. १२ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून काळ्या रंगाच्या नऊ बॅगा उतरविण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भातील व्हिडिओ एक्सपोस्ट करत नाशिकमध्ये पैसे वाटण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी या बॅगा आणल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंनी बुधवारी (दि. 15) रात्री ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत विजयाच्या टिप्स दिल्या.

शेवटच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून पैशांचा पाऊस पाडला जाईल, त्यामुळे गाफील राहू नका अशा सूचना देताना, विरोधकांना उघडे पाडा असा संदेश त्यांनी दिला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने गुरुवारी (दि. १६) रावसाहेब थोरात सभागृहात बैठक आयोजित करत लक्ष्मीदर्शन कसे रोखायचे यावर प्रशिक्षण दिले. या बैठकीला सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गिते, विनायक पांडे, संजय चव्हाण यांच्यासह मविआचे पदाधिकारी उपस्थित होते.

पैसे वाटपाचा व्हिडिओ आयोगाला पाठवा

प्रतिस्पर्धी उमेदवाराचे प्रतिनिधी पैसे वाटत असल्याचे दिसल्यास पहिली खबर पोलिसांना द्या, त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींशी संर्पक साधा. पैसे वाटपाचा व्हिडिओ काढून तो निवडणूक आयोगाकडे पाठवा, अशा सूचना देताना निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांचे संपर्क क्रमांकही या बैठकीत देण्यात आले. झोपडपट्ट्यांमधील मतदारांना पैसे वाटप होण्याची शक्यता लक्षात घेत झोपडपट्ट्यांवर अधिक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पैसे वाटपावर लक्ष ठेवण्यासाठी विभागनिहाय प्रतिनिधींची नियुक्तीही यावेळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –