महाराष्ट्रात महायुतीला ‘४५ प्लस’ जागा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करणे हेच आमचे ध्येय आहे. मोदी यांच्या नेतृत्वात देशात लोकसभेच्या ४०० पार तर महाराष्ट्रात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काॅंग्रेस महायुती एकत्रित ४५ प्लस जागा जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून नाशिक व महाराष्ट्राला ब्रॅण्डिंगची संधी लाभली असून, प्रशासन त्यासाठी सज्ज असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सोमवारी (दि.८) पंचवटीतील तपोवन मैदानावरील २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात ठिकठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकत असल्याबद्दल शिंदे यांचे लक्ष वेधले. त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आमच्यासाठी लोकसभा निवडणुकीला प्रथम प्राधान्य आहे. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करणे हेच आमचे ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्रामधून महायुतीच्या ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी देशभरात नाशिकची निवड होणे ही नाशिककरांसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अशी सुवर्णसंधी पुन्हा-पुन्हा येत नसल्याने आयोजनात कोणत्याही उणिवा भासणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना यंत्रणांना केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच स्थानिक कलाकारांना यानिमित्ताने आपली कला दाखविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले. बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नीलगिरी बाग येथील पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरसाठी उभारण्यात येणाऱ्या हेलिपॅडची पाहणी केली. तसेच सुरक्षा, व्हीव्हीआयपी मार्ग, नागरिकांसाठीच्या सुविधा आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त संदीप दिवसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

नाशिक सजवावे : शिंदे

देशातील विविध राज्यांतील आठ हजार युवक नाशिकला येणार आहेत. या सर्वांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. तसेच चारदिवसीय महोत्सवामध्ये शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे शहराची स्वच्छता राखावी. शहर सजवावे, रोषणाई करावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांना केले.

अंगणवाडी सेविकेने धरले पाय

तपोवन मैदानावर मुख्यमंत्री शिंदे दाखल होताच दोन अंगणवाडी सेविका त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे आल्या. यावेळी त्यातील एका सेविकेने थेट मुख्यमंत्र्यांचे पाय धरत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्हाला दिलासा द्यावा, अशी रडत मागणी केली. यावेळी शिंदे यांनी सेविकेचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सकारात्मक निर्णय घेऊ, असे सांगितले. दरम्यान, या दोघा अंगणवाडी सेविकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा :

The post महाराष्ट्रात महायुतीला '४५ प्लस' जागा appeared first on पुढारी.