महिंद्राची नाशिकमध्ये “ईव्ही’त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती

उदय सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिकल्स व्हेईकल (ईव्ही) क्षेत्रात 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने स्पष्ट केले होते. महिंद्राच्या या प्रकल्पाचा विस्तार नाशिकमध्ये केला जाणार असून, त्याकरिता कंपनी तब्बल सहा हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दावोस येथून घेतलेल्या ऑनलाइन पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.

दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पहिल्या दोन दिवसांत नाशिकमध्ये कोणत्याही स्वरूपाची गुंतवणूक आणली गेली नसल्याने, उद्योग क्षेत्रात काहीशी नाराजी व्यक्त केली जात होती. मात्र, तिसऱ्या दिवशी महिंद्राच्या माध्यमातून तब्बल सहा हजार कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये आणली जाणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर नाशिकच्या उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नाशिकची मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्राने आता ईव्ही क्षेत्रातही प्रकल्पाची पायाभरणी केल्याने अन् नाशिकमधून त्याला बळ दिले जाणार असल्याने स्थानिक उद्योग क्षेत्राला मोठे बूस्ट मिळणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे कुशल, अकुशल रोजगार वाढणार असून, अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे.

दरम्यान, महिंद्रा कंपनीवर अनेक उद्योग अवलंबून असल्याने, ही गुंतवणूक या उद्योगांना मोठा आधार ठरणार आहे. या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईलच, शिवाय शहराच्याही विकासात मोठी भर पडणार आहे.

व्हेंडरला मिळेल बूस्ट

मदर इंडस्ट्री असलेल्या महिंद्रावर अनेक व्हेंडर अवलंबून आहेत. त्यामुळे या गुंतवणुकीचा त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. केवळ या प्रकल्पामुळे व्हेंडरला आपल्यात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. सध्या ऑटोमोबाइल कंपन्यांनी पुढील जग हे ईव्ही व्हेईकलचे असेल असा विचार करून आपल्यात मोठा बदल केला आहे.

हेही वाचा :

The post महिंद्राची नाशिकमध्ये "ईव्ही'त सहा हजार कोटींची गुंतवणूक : उद्योगमंत्र्यांची माहिती appeared first on पुढारी.