NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू

नाशिक महानगरपालिका pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महानगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलांमधील तब्बल दीड हजार गाळेधारकांकडील ४४.५८ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी विविध कर विभागाने जप्ती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत गेल्या दोन दिवसांत शरणपूर मिनी मार्केटमधील पाच, यशवंत मंडईमधील चार, तर कथडा मार्केटमधील एक अशा प्रकारे 10 गाळे तसेच महात्मा फुले मार्केटमधील ओटा जप्त करण्यात आला आहे. येत्या आठवडाभरात मोहीम तीव्र केली जाणार असून, थकबाकीदारांचे गाळे जप्त करून लिलाव केले जाणार आहेत.

शहरातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महापालिकेने सहाही विभागांत व्यापारी संकुले, भाजी मार्केट, खोका मार्केटची उभारणी केली असून, लिलाव प्रक्रियेद्वारे २,९४४ गाळे वितरीत केले आहेत. या गाळ्याची मुदत संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी २०१७ मध्ये गाळ्यांसाठी रेडिरेकनर दरानुसार भाडेमूल्य निश्चित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भाडेदरात मोठी वाढ झाली. या निर्णयाला हरकत घेत गाळेधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. आदेशाच्या दिनांकापासून म्हणजेच ४ जानेवारी २०१७ पासूनच दरवाढ लागू करण्याची मागणी गाळेधारकांकडून करण्यात आली होती. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यापासून गाळेधारकांनी महापालिकेचे भाडे भरलेले नाही. त्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढत गेले. थकबाकीचा आकडा आता ४४.५८ कोटींवर पोहोचला आहे. त्यामुळे या गाळेधारकांकडील थकीत भाडे वसुलीसाठी विविध कर विभागाने मोहीम सुरू केली आहे. या विभागाने सुमारे दीड हजार थकबाकीदार गाळेधारकांना नोटिसा बजावल्या असून, विहित मुदतीत थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांवर जप्तीची कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसांत थकबाकीदारांचे 10 गाळे जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंत सात कोटी २२ लाख नऊ हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आले आहे. मार्च एण्डला आता थोडेच दिवस शिल्लक राहिल्याने वसुली मोहीम आता अधिक तीव्र केली जाणार आहे.

पश्चिममध्ये २५.१८ कोटींची थकबाकी
शहरातील सहाही विभागांतील सुमारे दीड हजार गाळेधारकांकडे महापालिकेचे ४४.५८ कोटींचे भाडे थकीत आहे. त्यामध्ये नाशिक पश्चिम विभागातील गाळेधारकांकडेच २५.१८ कोटींची थकबाकी आहे. त्याखालोखाल नाशिकरोडला ५.७८ कोटी, नाशिक पूर्व ५.७० कोटी, सातपूर ४.७० कोटी, पंचवटी १.९१ कोटी, तर नवीन नाशिक विभागातील गाळेधारकांकडे १.२९ कोटींचे भाडे थकीत आहे.

गाळेधारकांनी आपल्याकडील भाडेपोटीची थकबाकी त्वरित भरावी. महापालिकेची गाळेजप्तीची कटू कारवाई टाळावी. – मयूर पाटील, सहायक आयुक्त, विविध कर विभाग.

The post NMC : ४४ कोटींच्या वसुलीसाठी मनपाची जप्ती मोहीम सुरू appeared first on पुढारी.