मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महायुतीच्या रिक्षाला मनसेचे इंजीन जोडले जाणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू असताना, आता मनसेनेही नाशिकसह शिर्डीवर दावा केल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे. नाशिकची जागा मनसेला गेल्यास भाजपचा दावाही कायमस्वरूपी खोडला जाणार असल्यामुळे केंद्र आणि राज्य पातळीवर मनसेचे महायुतीत स्वागत होत असताना, स्थानिक पातळीवर मात्र मनसेच्या आगमनामुळे भाजपमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान करण्यासाठी भाजपने ‘अबकी बार ४०० पार’ असा नारा दिला आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. त्यादृष्टीने महायुतीने व्यूहरचना आखली आहे. मात्र सर्वेक्षणात महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून बळ मिळत असल्याचे समोर आल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला नामोहरम करण्यासाठी मनसेला महायुतीत सामावून घेण्याची खेळी भाजप नेत्यांनी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात परतल्यानंतर त्यांनी शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी वाढविल्या. गुरुवारी (दि. २१) राज्यातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांनी घेतली. त्यात नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. या गुप्त बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. निवडणूकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी भाजपकडे नाशिक, शिर्डी आणि मुंबईतील एक अशा तीन जागांचा प्रस्ताव दिला असून, भाजप राज ठाकरेंना दोन जागा देण्याची शक्यता आहे. नाशिक हा कधीकाळी मनसेचा गड मानला जात होता. त्यामुळे पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी नाशिकवर मनसेचा दावा राहणार आहे. तसेच दक्षिण मुंबईची जागा नाकारली गेल्यानंतर बाळा नांदगावकर यांच्यासह शिर्डीची जागा मनसेने मागितली असल्याची चर्चा आहे. या दोन्ही जागांवर शिंदे सेनेचा मूळ दावा असल्यामुळे या जागा मनसेला मिळाल्यास शिंदे सेनेतील इच्छुकांचे काय होणार, विशेषत: नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे आता गोडसे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहिल्याने शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे.

भाजपपेक्षा शिंदे गटाचे नुकसान अधिक
नाशिक व शिर्डी या दोन्ही जागांवर शिंदे गटाचा मूळ दावा आहे. या दोन्ही जागा मनसेला गेल्यास शिंदे गटाला मोठा फटका बसणार आहे. विशेषत: नाशिकच्या जागेवरून भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू आहे. आता मनसेच्या एन्ट्रीमुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपनेदेखील नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी कंबर कसली आहे. आता ती जागा मनसेला मिळाल्यास भाजपमधील नाराजीचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

The post मनसे एन्ट्रीमुळे शिंदेसेनेत अस्वस्थता; भाजपमध्येही नाराजी appeared first on पुढारी.