माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ

पंचवटी www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

कांदा, कोथिंबीर, द्राक्ष पिकांना हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी माकपच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी रविवारी, दि. 12 विधान भवनाच्या दिशेने कूच केली. रविवारी सायंकाळी उशिरा नाशिक येथील म्हसरूळ परिसरात मुक्कामी आलेला लॉंग मार्च मोर्चा सोमवार (दि.१३) रोजी सकाळी दहाच्या सुमारास म्हसरूळ कडून शहरातील दिंडोरी रोड, मुख्य बाजार समिती, दिंडोरी नाका, काट्या मारूती चौक, संतोष टी पॉइंट मार्गे मुंबई नाक्याच्या दिशेने पुढे गेला असून २३ मार्च रोजी हा मोर्चा मुंबईत धडकणार आहे.

म्हणून काढला लॉंग मार्च…
जमीन कसणाऱ्यांच्या नावे करून सातबारावर नाव लावावे.
अपात्र जमीनदाव्याची पूर्तता करून दावे पात्र करावेत.
प्रत्येक मंजूर प्लॉट धारकाला विहीर, सोलर वरील वीज पंप, पाईपलाईन, जमिनीचे सपाटीकरण, फळबाग, लागवड सारख्या केंद्र सरकारने प्लॉट धारकांना जाहीर केलेल्या योजना राबवाव्यात.
गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा.
ज्या गायरान जमिनीवर घरे आहेत ती घरे नियमित करा.
प्रधान मंत्री आवास योजनेचे अनुदान एक लाख चाळीस हजारा वरुन पाच लाख रूपये करावे.
वंचित गरीब लाभार्थ्यांचा नवीन सर्वे करून त्यांची नावे, “ड” यादीत समाविष्ट करावेत.
नार पार तापी नर्मदा नदी जोड प्रकल्प रद्द करून सुरगाणा पेठ त्र्यंबकेश्वर या तालुक्यातून पश्चिम वाहिन्या नद्यांना छोटे मोठे सिमेंट काँक्रेटचे बंधारे पाझर तलाव लघु पाटबंधारे यासारख्या योजना घेऊन प्रथम पुरेसे पाणी स्थानिकांना द्यावे.
शेतकऱ्यांच्या कांदा, द्राक्ष व इतर शेती पिकांना हमीभाव मिळावा.
लाल कांद्याला सहाशे रूपये अनुदान जाहीर करून कांदा निर्यातीचे धोरण जाहीर करा.

भाटरतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) नाशिक जिल्ह्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी आमदार कॉम्रेड जिवा पांडू गावित यांच्या नेतृत्वात दिंडोरी येथून मुंबईपर्यंत महाराष्ट्राच्या विधानभवनावर पायी लाँगमार्चला रविवारी (दि.१२) रोजी दुपारी २ वाजता सुरुवात झाली. या मोर्चात दहा हजार महिला-पुरुषांनी सहभाग घेतला आहे. माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्याशी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री आरोग्यमंत्री भारती पवार आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी फोनवर संपर्क साधत मध्यस्थी करण्याची भूमिका बजावत हा मोर्चा नाशिक येथेच थांबवावा आणि सरकार सोबत चर्चा करावी अशी विनंती केली. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळात मागण्यांबाबत निर्णय घेतल्याशिवाय हा मोर्चा थांबणार नाही तो विधानभवनावर धडकणार असे गावित यांनी सांगितले. नाशिक-मुंबई महामार्गावरून मोर्चा मार्गक्रमण करत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोरोनापूर्वी असाच नाशिक ते विधानभवन मोर्चा काढण्यात आला होतो. त्यावेळचा भव्य मोर्चा पाहून राज्य सरकारही हलले होते. यंदाच्या मोर्चाचा पहिला मुक्काम म्हसरूळ येथे झाला. मोर्चासोबत पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी डॉ. डी. एल. कराड, माकपचे जिल्हा सेक्रेटरी रमेश चौधरी, सावळीराम पवार, मोहन जाधव आदींची उपस्थिती होती.

लक्षणीय सहभागाचा लाल झेंडा
तळपत्या उन्हात हि कसलीच तम्हा न बाळगता लॉंग मार्चमध्ये पुरुषांसह महिलांचाही सहभाग लक्षणीय दिसुन आला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह असलेले लाल झेंडे, किसान सभा लिहिलेल्या लाल रंगाच्या गांधी टोप्या परिधान केलेले शेतकरी बांधव यामुळे रस्ते लाल रंगाने भरून निघाले होते. हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झालेले असतांनाही शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा मार्गक्रमण करत होता.

हेही वाचा:

The post माकपचा लॉंग मार्च नाशिकच्या पंचवटीतून मार्गस्थ appeared first on पुढारी.