शहरातील पहिल्याच पावसात रस्ते उखडून खड्डे पडले असून, गटारे तुडुंब भरून घाण पाणी मुख्य रस्त्याने वाहिल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नगर परिषदेकडून कागदोपत्री करण्यात आलेल्या कामांची पोलखोल झाली आहे. मात्र, या सगळ्या प्रकारात अधिकारी मस्त अन् प्रशासन सुस्त अशी काहीशी अवस्था झाली आहे. यात आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्ष घालण्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
शहरात रविवारी (दि. 9) जोरदार पाऊस झाला. त्यात गटारांमध्ये घाण साचल्यामुळे पाणी गटारातून न वाहता मुख्य रस्त्यावर प्रवाहित झाले. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांचे हाल झाले. राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असल्याने यात चारचाकी गाडी अडकली. पाण्याचा वेग अधिक असल्याने ती गाडी १५० ते २०० फूट लांबपर्यंत सरकत गेली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला केल्याने अनर्थ टळला. नगर परिषदेने यंदा गटारे स्वच्छ न केल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. पावसाळ्यापूर्वी नगर परिषदेकडून गटारांची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. नगर परिषदेकडून शहरात स्वच्छतेवर दरवर्षी करोडो रुपये खर्च केले जातात. असे असताना स्वच्छता रामभरोसे आहे. मात्र, स्वच्छताच होत नसेल, तर कोट्यवधींचा खर्च कुठे होतो असा प्रश्न सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.
रस्तेकामाचे पितळ उघड
शहरात करण्यात आलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे आहे, असे पहिल्याच पावसात उघड झाले आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पाणी साचल्याने या खड्ड्यांतून दुचाकी, चारचाकी वाहने गेल्यावर खड्ड्यातील पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडून वाद होत आहेत. तसेच वाहनांचा अपघात होण्याचा धोका आहे.
हेही वाचा: