मान्सूनमधील आपत्ती टाळण्यासाठी खबरदारी, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

इमारतींचे ऑ़़डिट करा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृतसेवा – पावसाळ्यात धोकेदायक इमारतींमुळे ओढावणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवाव्या. अशा इमारतींचे तातडीने स्टक्चरल ऑडिट करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नाशिक व मालेगाव महापालिका तसेच नगरपंचायतींना केल्या आहेत.

अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल झाला असून नाशिकसह राज्यात तो वेळेवर दाखल होईल, असा अंदाज आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मान्सूनपूर्व कामांना वेग आला आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात नाशिक शहर तसेच ग्रामीण भागातील धोकादायक वाडे, इमारतींचा मुद्दा एेरणीवर येतो. पावसाळ्यात अनेकदा अशा मालमत्ता कोसळण्याच्या व त्यात जीविताहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन असे वाडे व इमारतींमधील रहिवासी व मालकांना नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडते. मात्र, यंदाच्या वर्षी चांगल्या मान्सूनाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्य वाडे-इमारती पडण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.

पावसाळ्यात गोदावरीची पुरपरस्थिती लक्षात घेत काठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. जुन्या नाशिकमधील काझीगढी येथील संभाव्य धोका लक्षात घेत तेथील नागरिकांचे जाणीवपूर्व स्थलांतरणासाठी प्रयत्न करावे. महापालिका व नगरपंचायतींनी मान्सून पूर्व जुन्या इमारती, पडके वाडे, पुल यांचे आॅडिट करताना संबंधितांना नोटीसा बजवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नाशिकमध्ये ११९८ धोकादायक इमारती

नाशिक शहर व परिसरात एक हजार १९८ धोकेदायक इमारती, घरे, जुने व मोडकळीस आलेले वाडे आहेत. त्यामुळे यासर्व मालमत्तांमध्ये वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना नोटीस बजावत जागा खाली करावी, असे सांगण्यात आल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच रहिवाशांनी घरे सोडण्यास नकार दिल्यास नगररचना अधिनियम २६८ नुसार पोलिसांच्या मदतीने घरे व इमारती रिकामे करण्यात येतील, अशी माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: