मान्सून अलर्ट : पूरपरिस्थिती आपत्ती निवारणासाठी जिल्हा व्यवस्थापन सज्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिल्ह्याकरिता आठ रबरी बोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. पावसाळ्यामध्ये उद‌्भवणाऱ्या संभाव्य पूरपरिस्थितीत मदतीसाठी या बोट्स फायदेशीर ठरतील.

बोट्सची वैशिष्ट्ये अशी…

  • रबरी तसेच मशिन्स‌् असलेल्या बोट्स
  • एकावेळी ८ ते १० व्यक्ती वाहून नेण्याची क्षमता
  • प्रत्येक बोटीची किंमत ८ ते १० लाखांच्या आसपास

हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत मान्सून सरासरी गाठेल अशी शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवर आहे. जिल्ह्यातील गोदावरी व दारणा या प्रमुख नद्यांसह अन्य नद्या-नाल्यांना उद‌्भवणाऱ्या पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने आपत्ती निवारणासाठी आतापासूनच आडाखे बांधले जात आहेत. त्यामध्ये स्थानिकांच्या तात्पुरत्या पुनर्वसनापासून ते अन्य बाबींवर काम केले जात आहे. या प्रयत्नांना आता राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची जोड लाभली आहे.

एकूण 40 बोट्सची खरेदी

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ४० बोट्स खरेदी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक बोटीची किंमत साधारणत: आठ ते दहा लाख रुपये आहे. शासनाने नाशिकला आठ, धुळ्याकरिता सहा, ठाणे चार, जळगाव तीन, नंदुरबार चार, नगर एक तसेच एसडीआरएफला या बोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नाशिक जिल्ह्याकरिता आठ रबरी बोट्स उपलब्ध करून दिल्या आहेत. या बोट्स जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्या आहेत. नाशिक, इगतपुरी, मालेगाव, कळवणमध्ये नद्या-नाल्यांमुळे उद‌्भवणाऱ्या पूरपरिस्थितीचा विचार करून या प्रत्येक तालुक्यात एक-एक बोट देण्याचे प्रशासनाकडून प्रस्तावित आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे उद‌्भवणाऱ्या आपत्तीवेळी बचावकार्यात या बोट्सची मदत होणार आहे.

हेही वाचा: