नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावरील गोळीबार हा राजकीय वादातूनच झाला आहे. मालेगावमधून एमआयएमचे बस्तान उखडवण्यासाठीच हे राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. चार जूनला लोकसभेचा निकाल आल्यानंतर आपल्याला लोक बंदुका घेऊन दिसतील. जो ताकदवर आहे त्याला बंदुकीने धाक दाखवला जाईल. बंदूकीच्या जोरावर विरोधकांना नेस्तानाबूत करण्यात येईल, असा दावाही जलील यांनी केला आहे.
मालेगाव येथील एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबारात मलिक हे गंभीर जखमी झाले. त्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खासदार जलील यांनी आज अब्दुल मलिक यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रहार केला. जलील म्हणाले की, मालेगावमध्ये एमआयएम पक्षासाठी अब्दुल मलिक आणि त्यांच्या भावाने याआधी खूप प्रयत्न केले आहेत. तेव्हाही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला. खूप विरोध झाला, जे प्रस्थापित पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता. आमच्यावर अनेक हल्ले देखील झाले होते. तरीही लोकांना एमआयएम पक्षच पाहिजे होता. निवडणूक काळात आम्हाला विरोध करण्यात आला. निवडणूक लढू नका, मात्र विरोध झाल्यानंतर देखील आम्ही लढलो आणि जिंकलो. महाराष्ट्रात विधानसभेला मालेगाव आणि धुळे या दोन आमच्या सीट आल्या होत्या आणि तेथे आमचे प्रमुख केंद्र बनले. मालेगावमध्ये अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबाराची घटना झाली. त्यानंतर मला फोन आला आणि मी तात्काळ पोलिसांची बोललो, त्यांनी सांगितले की आरोपींचा शोध लागला आहे. या प्रकरणात जमीनीचा वाद असल्याचे मला कुठेही दिसत नाही, त्याची मी माहिती घेतली आहे. या प्रकरणानंतर मला असे वाटते की, आमच्या लोकांना कुठेतरी अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आपल्याला ते सर्व समजेलच. चार जूनला लोकसभेचा निकाल आल्यानंतर आपल्याला देखील लोक बंदुका घेऊन दिसतील. जो ताकदवर आहे त्याला बंदुकीने धाक दाखवला जाईल, थांबवले जाईल आणि हा पूर्ण डाव आहे. या प्रकरणात कोणताही वाद झाला नाही याची मी पूर्ण माहिती घेतली आहे. या प्रकरणात रात्रीच्या वेळी कोणीतरी येतो आणि गोळीबार करतो, समोरच्याला संपवून टाकायचे हाच त्यांचा उद्देश होता. या प्रकरणात दोन्ही बाजुने गोळीबार झालेला नाही. झाला असेल तर पोलिसांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही जलील यांनी केली.
मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना इशारा
महाराष्टात कायदा व सुव्यवस्था संपुष्टात आल्याचा दावा करत जंगलराज सुरू असल्याचा दावा खा. जलिल यांनी केला. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावर बोलले पाहीजे, असे नमूद करत वाद अशाप्रकारे गोळीबाराने सोडविले जाणार असतील तर पोलीस आणि न्यायालयात वाद सुटणार नाहीत, त्यासाठी बंदूक आणि शस्त्रे घेऊन रस्त्यावर उतरावे, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे. यासारख्या घटना केवळ सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडत आहेत. सत्तेसाठी साम-दाम-दंड वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप देखील जलील यांनी केला.
—