मुंबई-नाशिक महामार्गावर जळत्या वाहनाचा थरार; सुदैवाने अनर्थ टळला

घोटी (नाशिक) : मुंबई-नाशिक महामार्गावर हरिचंद्रगडावर निघालेल्या टेकिंगविरांच्या टेम्पो ट्रॅव्हल वाहनाला इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे तळेगाव शिवारात शनिवार (ता. १२) सकाळी साडेआठला आग लागली. आगीत वाहन जळून खाक झाले.

मुंबईमार्गे येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच ४३, एच ४७५६) या प्रवासी वाहनास साडेआठच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहनातील प्रवाशांनी वाहनाबाहेर तातडीने बाहेर पडून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोटी टोलनाका, इगतपुरी नगर परिषद, महिंद्र कंपनीच्या अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करत आग आटोक्यात आणली. मुंबई येथून बारा महिला व दोन पुरुष प्रवास करत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, भररस्त्यात जळत्या वाहनामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

इगतपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी, महामार्ग घोटी टेपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, महिंद्र कंपनीचे अग्निशमन दलाचे अधिकारी हरिश चौबे आदींच्या प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आली. काही वेळात वाहतूक पूर्ववत सुरू झाली. 

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ