मुख्यमंत्र्यांचा संवाद गोडसेंना भोवला, खर्च निरीक्षकांची नोटीस

एकनाथ शिंदे, हेमंत गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी शहरातील उद्योजक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संवाद साधला. नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी या बैठकांची दखल घेत खर्चावरून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना नोटीस बजावली आहे. सदरचा खर्च आपल्या उमेदवारी खर्चात अंतर्भुत का करू नये, असा प्रश्नच नोटीसद्वारे गोडसेंना करण्यात आला आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या बैठकीच्या खर्चाची संदिग्धता कायम आहे.

उमेदवारांचा खर्च किती ?

  • हेमंत गोडसे : ४४ लाख ७३ हजार
  • राजाभाऊ वाजे : ३४ लाख ३० हजार
  • शांतिगिरी महाराज : १० लाख १६ हजार
  • करण गायकर : ५ लाख ३९ हजार
  • सोमेश्वरानंद सरस्वती महाराज : १६ लाख ३९ हजार

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि. २०) पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात उमेदवारांकडून स्टार प्रचारकांना पाचारण करून प्रचाराची राळ उडवून दिली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही ताकद पणाला लावली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन स्वतंत्र बैठका घेत विविध संघटनांचे पदाधिकारी व उद्योजकांशी संवाद साधला. या संवादावेळी गोडसे अनुपस्थित होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी बैठकांमधूनच थेट गोडसेंच्या विजयासाठी मतांचा जाेगवा मागितला. हाच धागा पकडत नाशिक मतदारसंघाच्या खर्च निरीक्षकांनी थेट गोडसे यांना नोटीस बजावली आहे.

बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण असल्याचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या माध्यमातून गोडसेंना नोटीस बजावण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आपल्या नावे प्रचार केला. त्यामुळे निवडणुकीचा खर्च आपल्या उमेदवारी खर्चामध्ये का दाखवू नये, असा प्रश्नच त्यांना करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बैठकांचे व्हिडिओ चित्रीकरण आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावादेखील खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांनी केला आहे. त्यामुळे ऐन मतदानाच्या तोंडावर गोडसेंच्या अडचणीत भर पडणार आहे.

बैठकीला ‘हे’ दाेघे अनुपस्थित

नाशिक मतदारसंघातील उमेदवारांचा दुसऱ्या टप्प्यातील खर्चाची ताळमेळ बैठक मंगळवारी (दि. १४) पार पडली. यावेळी ३१ पैकी २९ उमेदवारांचे प्रतिनिधी खर्चाची कागदपत्रे घेऊन हजर होते. तर इंडियन पीपल्स अधिकार पार्टीच्या भाग्यश्री अडसूळ व आम जनता पार्टीचे कैलास चव्हाण हे दोघे अनुपस्थित होते. त्यामुळे या दोघांनाही नोटीस बजावण्यात आली असून, अडसूळ यांना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली आहे.

हेही वाचा –