नाशिक : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’.. या स्त्री महात्म्याची व्यापकता आधोरेखित करणारे हे प्रमेय सर्वश्रुत आहे. कुटुंब आणि समाजाच्या एकूण जडणघडणीमध्ये स्त्रीचा निर्णायक वाटा असतो. पुरुष कितीही कर्तृत्वान असला, तरी त्याचे मोठेपण स्त्रीमुळे आहे. तेजाळते हे शाश्वत सत्य आहे. आजचा जागतिक महिला दिन अवघ्या ‘स्त्रीत्वाचा सन्मान करणारा..’ स्त्री विश्वाप्रति कृतज्ञतेचा नमस्कार करणारा अशा स्वरूपाचा आहे. यंदाच्या महिला दिनाची ‘इन्स्पायर इनक्ल्युजन’ ही थीम स्त्रीला सर्व क्षेत्रांत सन्मान आणि सक्षमीकरणाच्या संधी बहाल करण्याची कटिबद्धता उद्धृत करणारी आहे. ‘जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी’ या काव्यपंक्ती स्त्रीच्या विश्वव्यापी महत्त्वाची समृद्धी कथन करणाऱ्या ठराव्यात. या पार्श्वभूमीवर शासकीय स्तरावर उच्चपदी पोहोचलेल्या ‘सबलां’चा अवघ्या स्त्री जगतासाठीच्या संदेशाचे शब्दांकन केले आहे अंजली राऊत यांनी…..
स्त्री – पुरुष अथवा थर्ड जेंडर असा कोणताही भेदभाव न करता, प्रत्येकाकडे ह्युमन बिइंग म्हणून म्हणून बघायला हवे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून समानतेने वागवायला हवे. मनुष्याच्या मूलतत्त्वातच कल्याण आहे. बुद्धिमत्ता आणि माणुसकी यांच्यामुळेच मनुष्यप्राणी हा इतरांपेक्षा वेगळा आहे. मनुष्यामध्ये एक समान चांगुलपणा, उपकार, नैतिकतेची जबाबदारी हे गुण असतात. ते त्याने जपले की, आपोआपच समानतेचे पालन होते. त्यानंतर तिथे कोणताच भेदभाव उरत नाही. मानवतेचा मूलभूत गुण हा मानवतावादातून येतो. त्यामुळे समाज आणि व्यक्ती जिथे एकमेकांशी जोडलेले असतात. तेथे स्त्री – पुरुष हा भेदभाव न करता, प्रत्येक क्षेत्रात सन्मानाने कार्य करण्याचा हक्क मनुष्याला आहे. त्यामुळे मानवतावादी दृष्टिकोनातून स्त्रीला सक्षमीकरणाचा लाभ हा मिळायलाच हवा. – लीना बनसोड, अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग
नक्कीच, स्त्रियांचादेखील मुख्य प्रवाहामध्ये समावेश झालाच पाहिजे. कारण आजची स्त्री ही सक्षम आहे. तिने प्रत्येक क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलेले आहे तसेच एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या ही स्त्रियांची आहे. कोणताही भेदभाव न करता स्त्रियांना मुख्य प्रवाहात समाविष्ट केले, तर समाजाला नवी वाट, नवीन वळण नक्कीच मिळेल व स्त्रियांच्या अनुभवाचा फायदा समाजाला होणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये विशेषत: ग्रामीण भागातील महिला आणि पुरुष दोघेही असुरक्षित असतात कारण त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी स्थानिक नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून राहावे लागते. अशा वेळी महिलांकडे बऱ्याचदा सखोल ज्ञान आणि कौशल्य असते. ज्याचा वापर आपत्ती कमी करणे आणि अनुकूल धोरणांमध्ये केला जाऊ शकतो. तसेच नैसर्गिक आणि घरगुती संसाधने या नात्याने, घरांमध्ये आणि समुदायांमध्ये महिलांच्या जबाबदाऱ्या, त्यांना बदलत्या पर्यावरणीय वास्तविकतेशी जुळवून घेता येते. उपजीविकेच्या धोरणांमध्ये योगदान देण्यास महिला चांगले स्थान देऊ शकतात. – मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त.
कोणत्याही क्षेत्रात आज महिलांनी चांगले नाव कमावलेले आहे. असे असले, तरी महिला आणि पुरुष यांच्या शर्यतीत सशर्त नि:पक्षपातीपणा असायला हवा. महिला ही पोलिस, महसूल, शिक्षक आदी क्षेत्रांत कार्यरत असली, तरी पूर्णपणे स्वतंत्र आहेच असे म्हणता येणार नाही. महिला सबलीकरण होऊनही ती कोणत्याही क्षेत्रात वरिष्ठ पदावर जरी असली, तरी तिला घरातले काम चुकलेले नाही. आजही नोकरदार मुली किंवा महिला आठ तास कार्यालयीन काम करून घरी आल्यावर त्यांना घरचे काम चुकलेले नाही. घर किंवा कुटुंब हे दोघांचे असून, दोघांची जबाबदारी समसमान आहे. महिला दिन किंवा समान हक्क कागदावर नाही, तर हा खऱ्या अर्थाने तेव्हा होईल जेव्हा वैचारिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. स्त्री शिकली म्हणून महिला दिन साजरा होत नाही, तर तिला पूर्णपणे सक्षमीकरणाचा लाभ मिळायला पाहिजे. – हेमांगी पाटील, प्रांताधिकारी, निफाड
पूर्वी आणि आताच्या महिलांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा बऱ्याच प्रमाणात बदलल्या असून, आताचे पालक मुलींच्या संगोपनासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी खूप उत्सुक असलेले दिसून येतात. मुलींसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात नवनवीन योजना, नवीन धोरण आणि कायदे आलेले असले, तरी वरवर पाहता दुरून डोंगर साजरे असाच प्रकार वाटतो. कारण खोलवर विचार केला, तर अजूनही पुरुषांची मानसिकता पाहिजे तशी बदललेली दिसून येत नाही. मुलींची प्रगती झाली, त्या उच्चशिक्षित झाल्या, हे सर्व वरवर ठिक आहे. परंतु सामाजिक स्तरावर अजूनही खोलवर पुरुषी मानसिकतेची पाळेमुळे घट्ट रोवून आहेत. त्यामध्ये महिलांनी टिकून राहणे अवघड झाले आहे. महिला दिन दरवर्षी अगदी थाटामाटात डोक्यावर फेटा घालून सन्मानाने साजरा केला जातो. परंतु यामध्येही सोनेरी मुलामा दिलेला खोटेपणा दडलेला दिसतो. त्यामुळे मुले किंवा मुली यांच्यावर ते लहान असल्यापासूनच समानतेची वागणूक द्यायला हवी. समाजस्तरावर अजूनही मोठ्या प्रमाणात काम करण्याची गरज आहे. कारण ही लढाई मोठी आहे. ‘इन्स्पायर इनक्लुजन’ असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा समाजात स्त्री-पुरुष यांच्यामध्ये बॅलन्स राहायला पाहिजे. त्यांना त्यात सामावून घ्यायला हवे. त्यांचे खच्चीकरण न होता, सक्षमीकरणाचे लाभ त्यांना मिळायला हवेत. प्रगती झाली असे म्हटले, तरी स्त्रियांची जबाबदारी कमी झाली असे नाही. तर उलट ती दुपटीने वाढली आहे. रांधा, वाढा, उष्टी काढा… हे स्त्रीच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ सुटले तर नाहीच नाही पण त्यात शिक्षण, नोकरी, करिअर आदींची भर पडलेली आहे. ती कुटुंबाचा वटवृक्षही शांततेने सांभाळत सर्वांना मायेने सामावून घेण्याची जबाबदारीही पार पाडत आहे. स्त्रीची मानसिकता काही अंशी बदलली असली, तरी पुरुषी मानसिकतेत अजूनही काहीही बदल झालेला नाही. सोफ्यावर पेपर वाचत बसलेली स्त्री नि त्याचवेळी स्वयंपाकघरात काम करणारा पुरुष… हे चित्र अजूनही दुर्मीळतेबरोबरच हेटाळणीचा विषय आहे. हे जोपर्यंत बदलत नाही नि समानता ही जोपर्यंत मनापासून स्वीकारली जात नाही, तोपर्यंत “नेमेचि येतो मग पावसाळा…” ह्या उक्तीप्रमाणे महिला दिन येतील नि जातील पण महिला ‘दीन’च राहतील. – प्रज्ञा बढे-मिसाळ, उपायुक्त, रोहयो महसूल विभाग.
पुराणात महिलांना देवीचे रूप मानले गेले आहे, तर समाजात बघता महिलांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे दिसत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त असलेली या वर्षीची थीम अतिशय समर्पक अशी आहे. ‘इन्स्पायर इनक्लुजन’ अशी ही थीम आहे. ‘इन्स्पायर इनक्लुजन’ म्हणजे स्त्रियांचे महत्त्व समजून घेण्यासाठी लोकांना जागरूक करणे. या थीमचा अर्थ असा आहे की, महिलांसाठी अशा समाजाच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे जिथे महिलांचादेखील समावेश करून घेतला असेल जेणेकरून त्यांना सशक्त वाटेल. याबरोबरच महिलांना जशा आहे तशा स्वीकारणे हे अतिशय प्राधान्याने होणे आवश्यक आहे. एखाद्या समितीमध्ये, कार्यालयात किंवा कुटुंबातही एखाद्या महिलेचे मत हे काळजीवाहू, सकारात्मक आणि भावनेने भरलेले असते. त्याचा उपयोग समाजाच्या विकासासाठी होत असतो. म्हणून सध्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या महिलांचा समावेश निर्णयक्षमतेमध्ये किंवा धोरण तयार करताना घेत असतात. – आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
महिलांना आजही महत्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी केले जात नसल्याचे चित्र बहुतांश कुटूंबामध्ये दिसते. मोबाइल किंवा इतर वस्तू विकत घेण्यासाठीही तिला विचारले जात नाही किंवा तिचा निर्णय नसतो. मुलांचे शैक्षणिक, करीअरचे निर्णय घेतानांही महिलेचे मत विचारत घेतले जात नाही. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये महिलेचे मत फक्त विचारले जाते मात्र अंतिम निर्णय तिचा नसतो. महिलांचाही यात स्वत:हून सहभाग नसल्याचे आढळते. आपल्या निर्णयामुळे कुटूंबाची आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक प्रगती होते, मात्र असे निर्णय घेण्यात महिला मागे असल्याचे दिसते. महिलांनी निर्णय घेतले पाहिजे. तसेच महिलांच्या निर्णयाचे स्वागतही सर्वांनी केले पाहिजे. जेणेकरून महिलांना पाठबळ मिळेल. त्याचप्रमाणे महिलांनी त्यांच्या माहितीचे स्त्रोत वाढवले पाहिजे. त्यासाठी पुस्तक वाचन, इंटरनेटचा वापर केला तरी चालेल. मात्र राजकीय, सामाजिक, इतिहास, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्वाची माहिती महिलांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांच्यातील निर्णयक्षमताही वाढण्यास मदत होते. – शर्मिष्ठा वालावलकर, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग.
कोणत्याही यशस्वी लोकशाही देशाचे धोरण हे महिला घटकाच्या समावेशाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. या समावेशनाची सुरुवात कुटुंबापासून होणे आवश्यक आहे. कुटुंबामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयामध्ये कुटुंबातल्या स्त्रीचे मत घेणे, तिला सहभागी करून घेणे हे खरेच घडते का? नसेल तर त्यासाठी दुसऱ्यांनी तिला संधी द्यावी. यासाठी प्रयत्न करणे हा एक भाग पण स्त्रीने स्वतः ही संधी साधणे आणि तशी गरज निर्माण होणे इतकी ती सक्षम होणे ही पूर्व अट आहे. कुटुंब असो, कामाचे ठिकाण असो, समाज असो वा देश. सर्वच पातळीवर स्त्री सक्षमपणे आपले योगदान देऊ शकते. परिवर्तन घडवून आणू शकते. कोणत्याही विकासाच्या प्रक्रियेमध्ये महिलांचा समावेश होणे ही महिलांच्या विकासाची गरज आहे. या भ्रमातून प्रथमतः बाहेर पडणे आवश्यक आहे. तर ती समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासाची गरज आहे, याचे भान वेळीच येणे गरजेचे आहे. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करणे, तशी व्यवस्था निर्माण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येक स्त्रीने आग्रह धरणे आवश्यक आहे. – स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका, नाशिक.
सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबित्व यातून स्त्रियांची सुटका व्हायची असेल, तर महिला सक्षमीकरणाची गरज आहे. प्रथम ‘आपण सक्षम आहोत’याची खात्री स्त्रियांनी बाळगणे गरजेचे आहे. आपण स्त्री आहोत, या आत्मग्लानीमध्ये कधीही राहू नका. जेव्हा तुम्ही आत्मग्लानीमध्ये येता, तेव्हा ऊर्जा, उत्साह आणि सामर्थ्य गमावता. आध्यात्मिक मार्ग एकमेव मार्ग आहे. जेथे तुम्ही आत्मग्लानी आणि अपराधीपणावर मात करू शकता. स्वतःला दोष देणे बंद करून आपली स्तुती – कौतुक करणे सुरू करा. उभे राहा, तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी गरजेचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. नक्कीच समाजामध्ये बदल घडायलाच हवा. मी स्वतः एकल पालकत्व करीत आहे. मी दिवसभर कार्यालयीन कामकाज संभाळून मी माझे घर व मुले यांना उत्कृष्ट प्रकारे संभाळते आहे. मला कार्यालयीन कामकाज करत असताना भरपूर अडचणी येतात पण मी खंबीरपणे सामोरी जात असते. मला कधीच असे वाटत नाही की, मी हे करू शकत नाही. आज मी माझ्या मुलांची आई आणि वडील हे दोघे होऊन त्यांना सांभाळते आहे. स्त्रीने स्वत:मध्ये बदल करून घरेलू हिंसाचार सहन न करता स्वत:च्या पायावर उभे राहून जगाशी लढले पाहिजे असे मला वाटते. – शैलजा नलावडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग 3, जिल्हा परिषद नाशिक.
The post यंदाच्या महिला दिनाची 'इन्स्पायर इनक्ल्युजन' ही थीम 'स्त्री'त्वाला उद्धृत करणारी appeared first on पुढारी.